पार्ले टिळकचा उद्या शताब्दी सांगता सोहळा, राज्यपालांच्या हस्ते शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन अनेक पिढय़ा घडविणाऱया पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन आणि पार्ले टिळक विद्यालय मराठी शाळेचा शताब्दी सांगता कार्यक्रम 9 जून रोजी होणार आहे. गेल्या वर्षी या शैक्षणिक संस्थेने 100 वर्षे पूर्ण केली. शताब्दी सांगतानिमित्त संस्थेच्या 101 व्या वर्धापनदिनी भव्य सोहळय़ाचे आयोजन संस्थेच्या विलेपार्ले येथील मराठी शाळेच्या पटांगणात करण्यात आले आहे.

सकाळ सत्रात होणाऱया कार्यक्रमात हिंदुस्थानी निवृत्त हवाई दलप्रमुख प्रदीप नाईक, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मराठी शाळेला 100 वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने शाळेच्या प्रवेशद्वाराचे नूतनीकरण केले आहे. तसेच 100 वर्षांचा इतिहास डिजिटल स्वरूपात शाळेच्या लॉबीमध्ये पाहायला मिळणार आहे. विद्यार्थ्यांना संरक्षण दलात जाण्याची प्रेरणा मिळावी या हेतूने शाळेत एक विशेष शौर्य कक्षदेखील तयार करण्यात आला असून या सर्वांचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल गानू यांनी दिली.

कार्यक्रमाच्या संध्याकाळच्या सत्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ‘पद्मविभूषण’ डॉ. रघुनाथ माशेलकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी शताब्दी गौरव ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. या विशेष दिवसाचा शेवट संस्थेच्या विविध शाळांतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या समूह वादन, गायन, नृत्य आणि नाटक या कलागुण दर्शनाच्या कार्यक्रमाने करण्यात येणार आहे, अशी माहितीही संस्थेच्या वतीने देण्यात आली.