परळीत केंद्र सरकारचा निषेध करत नागरिकांनी व्यक्त केला मणिपूर घटनेबाबत संताप

मागच्या अडीच महिन्यांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई समुदायांमध्ये हिंसक संघर्ष सुरु आहे. या दरम्यान मागच्या बुधवारी मणिपूरमधल्या दोन महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा एक व्हीडिओ समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ परळीच्या राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे रविवार दि.23 जुलै रोजी नागरिकांकडून आंदोलन करण्यात आले व केंद्र सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

हा व्हीडिओ समोर आल्यापासून केंद्र सरकार विरुद्ध या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “मणिपूरमधल्या या घटनेवर अनेकांनी आज दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पण त्याचवेळेस जर केंद्र सरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं” असं मत उपस्थित आंदोलनकर्त्यांनी यावेळी मांडलं.

“मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे. ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा हिंदुस्थानपासून तुटेल” अशी भावना यावेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

या आंदोलनासाठी विविध पक्ष आणि संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य नागरिक उपस्थित होते. या आंदोलनाचे सामूहिक नेतृत्व हा चर्चेचा विषय ठरला. कोणी एका व्यक्तीने अथवा पक्षाने या मोर्चाचे आयोजन केले नव्हते तर सर्वसामान्य माणूस देशाचा अविभाज्य भाग असलेल्या मणिपूरमधील नागरिकांची सहवेदना समजून एकवटला. यावेळी मणिपूर सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.