
”दोन हिंदुस्थान बनवले जात आहेत. एक हिंदुस्थान हा अत्यंत श्रीमंत लोकांसाठी आहे. ज्यांच्याकडे अफाट संपत्ती आणि शक्ती आहे. तर दुसरा हिंदुस्थान हा गरिबांसाठी आहे”, असं काँग्रेस नेते राहुल गांधी आज संसदेसत आपल्या भाषणादरम्यान म्हटले आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना राहुल गांधी असं म्हणाले आहेत. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रपतींचे अभिभाषण हे देशातील वास्तविक परिस्थितीला धरून नव्हते, असं राहुल गांधी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणाले. ते म्हणाले, ”मागील वर्षी 3 कोटी तरुणांनी आपली नोकरी गमावली. युपीए सरकाराच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही 27 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. मात्र या सरकारने 23 कोटी लोकांना गरिबीत ढकलण्याचे काम केले आहे. मोदी सरकारने नोटाबंदी आणि जीएसटीने असंघटित क्षेत्र संपवले, ज्यामुळे आता दोन हिंदुस्थान झाले आहेत.”
राहुल गांधी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, संविधानात हिंदुस्थानाला राष्ट्र म्हटलेले नाही. हिंदुस्थान हा राज्यांचा संघ आहे. सरकारला इतिहासाचे ज्ञान नाही. प्रत्येक राज्याची स्वतःची संस्कृती, भाषा आणि इतिहास आहे. केंद्र राज्यांवर कोणताही दबाव आणू शकत नाही. हे काही साम्राज्य नाही, तर हा देश फुलांच्या गुलदस्त्यासारखा आहे. हा देश केंद्राच्या एका काठीच्या सहायाने चालू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.
शेतकरी आणि पेगॅससच्या मुद्द्यावर राहुल गांधी आक्रमक
राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना आपल्या भाषणात शेतकरी आणि पेगॅससचा मुद्दाही उपस्थित केला. ते म्हणाले की, शेतकरी रस्त्यावर बसून राहिले, पण राजाने कोणाचाही आवाज ऐकला नाही. सरकारच्या चौकटीत शेतकर्यांना स्थान नाही. राहुल गांधी पुढे म्हणाले, ”पेगॅसस स्पायवेअरच्या माध्यमातून संस्था नष्ट केल्या जात आहेत. पंतप्रधानांनी पेगॅससला इस्रायलमधून आणले होते, ज्याचा वापर हेरगिरीसाठी केला जात आहे.”
























































