
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी 31 जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील, अशी माहिती ‘इंडिया टुडे‘ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा अखेरचा अर्थसंकल्प आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकप्ल सादर केला जाणार असून यात महिला आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सरकार किसान सन्मान निधीची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे.
कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत – निर्मला सीतारमण
मला तुमच्या आशांवर पाणी फेरायचे नाही. मात्र, 1 फेब्रुवारी 2024 रोजी सादर होणारा अर्थसंकल्प हा केवळ मतदानासाठी आहे. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत सरकारचा खर्च भागवण्यासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. त्यासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्पानंतर वाट पाहावी लागणार आहे, असे विधान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे.






















































