संसदेचे अधिवेशन आजपासून- पावसाळय़ात विरोधक गरजतील काय? ईडी, अग्निपथ, महागाई, बेरोजगारीचा दारूगोळा तयार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे मुद्दय़ांचा दारूगोळा आहे. मात्र ऐन पावसाळय़ात हा दारूगोळा विरोधक सरकारवर फोडणार काय, याचे उत्तर उद्यापासून सुरू होणाऱया अधिवेशनातून मिळणार आहे. या अधिवेशनात देशाला नवे राष्ट्रपती व उपराष्ट्रपती मिळतील. त्यानंतर अनेक मुद्दय़ांवर संसदेत घमासान होण्याची चिन्हे आहेत.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी मतदान होईल तर गुरुवारी निकाल लागेल. उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्टला मतदान होईल आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन संपता संपता देशाला नवे उपराष्ट्रपतीही मिळतील.

सत्ताधारी–विरोधक दोघेही तय्यार!

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे अनेक मुद्दय़ांचा दारूगोळा आहे. संसदेचे गेले पावसाळी अधिवेशन एकटय़ा पेगाससच्या मुद्दय़ावरून वादळी ठरले होते. यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांची ईडीकडून सुरू असलेली चौकशी, नूपुर शर्मा नावाच्या बेताल भाजप नेत्याने मोहम्मद पैगंबरांविषयी केलेली बकबक, महागाई, बेरोजगारी, त्यात भरीला भर म्हणून अग्निपथ योजना अशा एक ना अनेक विषयांवर विरोधक सरकारला भंडावून सोडण्याची शक्यता आहे. जीएसटीवर चर्चा करण्याची मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी लावून धरली आहे. महागाई व विशेषतः एलपीजी गॅसच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. हा मुद्दाही या अधिवेशनात काँग्रेसकडून आक्रमक पद्धतीने मांडला जाण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी यांनी तसे सूतोवाचही केले आहे.

16 विधेयके मंजूर करण्याचे उद्दिष्ट

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एपंदरीत 16 विधेयके मंजूर करण्याचा सरकार पक्षाचा इरादा आहे. 18 दिवसांचे कामकाज या अधिवेशनात होणार असून भारतीय अंटार्क्टिक विधेयक, बाल विवाह प्रतिबंधक विधेयक, राष्ट्रीय डोपिंगविरोधी विधेयक या महत्त्वपूर्ण विधेयकांचा त्यात समावेश आहे. काही बँकांच्या खासगीकरणाचा घाटही सरकारने घातलेलाच आहे. या अधिवेशनातही काही बँकांच्या खासगीकरण अथवा विलीनीकरणावर शिक्कामोर्तब होईल.