गरिबीमुळे ‘वंशाचा दिवा’ विकला…आईकडून मुलाची सव्वा लाखात विक्री! आई-बापासह घेणाऱ्या दोघींविरुद्ध गुन्हा, मुकुंदवाडी येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तुझी परिस्थिती हलाखीची आहे. त्यात तुझा नवरा दारू पितो. तू बाळाचा सांभाळ कसा करणार?’ असे म्हणत बाळ विक्री करण्याचा सल्ला देऊन बाळ विक्रीला नकार देणाऱ्या आई-वडिलांचे मनपरिवर्तन करून अवघ्या दीड महिन्याचे बाळ १ लाख २० हजार रुपयांना खरेदी केले. या व्यवहारात वाद झाल्याने हा धक्कादायक प्रकार पोलिसांसमोर उघडकीस आला. बाळ विकत घेणारी महिला ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येताच पोलिसांनी बाळाची विक्री करणाऱ्या आई-वडिलांसह विकत घेणाऱ्या मायलेकीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौघांनाही ताब्यात घेतले आहे.

मुकुंदवाडी ठाण्याचे पोलीस हवालदार राजाभाऊ मारोती कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुंदवाडी, संजयनगरात योगेश रामप्रसाद कांबळे व त्याची पत्नी वंदना योगेश कांबळे हे दोघे राहतात. वंदना हिने ५ जुलै २०२६ रोजी घाटी रुग्णालयात प्रसूतीनंतर एका गोंडस बाळाला जन्म दिला. घाटी रुग्णालयातून १० जुलै रोजी सुट्टी झाल्यानंतर घरी आली. यावेळी तिच्या ओळखीची महिला कौशल्या बारकू पवार (६५, रा. रोहिदासनगर, मुकुंदवाडी) ही घरी आली. वंदनाला म्हणाली की, ‘तुझा पती दारू पीत असल्याने बाळाचा सांभाळ कसा करणार? त्यापेक्षा माझी मुलगी सीमा अनिल रेशवाल (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) ही लहान बाळ घेते. या बाळाच्या बदल्यात तुला एक लाख रुपये मिळतील.’ वंदनाने बाळ देण्यास नकार दिला. या दोघी मायलेकींनी पिच्छा न सोडता वंदनाच्या पतीला विक्रीचा प्रस्ताव दिला. सुरुवातीला नकार दिल्यानंतर ७ ऑगस्टला वंदना व योगेश बाळाला घेऊन सीमाच्या घरी गेले. तेथे पुन्हा बाळ देण्याबाबत चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी सीमा वंदनाला सोबत घेऊन गेली. सायंकाळी वंदना-योगेश बाळासह सीमाच्या घरी गेले. तेथे बॉण्डवर स्वाक्षऱ्या करून १ लाख २० हजार रुपये रोख घेतले आणि दीड महिन्याचे बाळ सीमाच्या ताब्यात दिले.

लिव्ह अॅण्ड रिलेशनशिपमधील जोडपे

पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफास करण्यासाठी दोघांची चौकशी केली असता वंदना व योगेश हे दोघेही पूर्वीच्या लग्नानंतर आपापल्या जोडीदारांसोबत न राहता मागील तीन-चार वर्षांपासून पती-पत्नीसारखे राहत असल्याचे चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागाच्या रजिस्टरचा सत्यप्रत उतारा मिळविला. वंदना आणि योगेश यांचे जबाबही नोंदविण्यात आले. दोघांनी बाळ १ लाख २० हजार रुपयांत सीमाला दिल्याचे मान्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बाळ सध्या नेमके कुठे आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. या प्रकरणी वरील चौघा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४३ (४), १४२, ३ (५) तसेच बाल न्याय कायदा २०१५ मधील कलम ८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक निरीक्षक घुगे करीत आहेत.