
मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये सर्व महिलांना गर्दीचे तास वगळून प्रवास करण्याची मुभा दिल्यानंतर तसेच खासगी सुरक्षा रक्षकांनाही प्रवासाची परवानगी दिल्याने लोकलमधील गर्दी वाढतच चालली आहे. त्यातच प्रवाशांना ऑनलाईन तिकीट काढण्याची सोय असलेले यूटीएस अॅप बंद केल्याने पुरेशा तिकीट खिडक्यांअभावी तिकीट खिडक्यांवर महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे.
रेल्वेने 21 ऑक्टोबरपासून सर्व महिलांना नॉन पिकअवरमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. मुंबई सध्या एकूण सव्वा सात लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. खासगी सुरक्षा रक्षकांच्या पाठोपाठ आता वकिलांनाही ठराविक वेळेत प्रवासाची मुभा देण्याच्या विचार करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या दहा लाखापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यातच ई तिकिटांचा यूटीएस अॅपचा पर्याय लोकल सर्वांसाठी खुली झाल्यानंतर चालू करण्यात येणार आहे. त्यातच एटीव्हीएम अनेक महिने वापर नसल्याने बंद असल्याने तिकीट खिडक्यांवर गर्दी वाढत आहे. येत्या काळात प्रवासी वाढणार असल्याने फेऱ्या वाढविण्याची गरज निर्माण होणार आहे.


























































