दापोली एस.टी आगाराच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली एस.टी.आगाराच्या गलथान कारभारामुळे खाजगी वाहतुकीचा पर्याय प्रवाशांना स्विकारावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी एस.टी. महामंडळाचे असलेले ब्रिदवाक्य खोटे ठरत आहे.

दापोली एस.टी. आगार प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे कधी नव्हे ती दापोली आगाराची एस.टी.बस सेवा पार कोलमडून गेली आहे. या आगारातून सोडण्यात येणाऱ्या बसेस उशीराने सुटणे जरी नित्याचे झाले असले तरी नियमित बसेस अनेकदा रद्द करण्याची नामुश्की येते. ही बाब एस.टी. आगार प्रशासनाच्या गलथान कारभाराचे उत्तम उदाहरण आहे. दापोलीतून प्रवासी असूनसुध्दा या आगारातून पश्चिम महाराष्ट्रात एस.टी.बसेस सोडल्या जात नाहीत. जिल्हयाच्या ठिकाणी जलद एस.टी.बस सेवा नाही नाही त्यामुळे जिल्हा मुख्यालयात एखाद्याला आपल्या कामासाठी जाणे झाल्यास वेळेत पोहोचता येत नाही.

मुंबई मार्गावर सोडल्या जाणा-या एस.टी.बस उशीराने सोडल्या जात आहेत. अनेक एस.टी.बसेसच्या झालेल्या दयनीय अवस्था या प्रवाशांना प्रवासासाठीच्या धोक्याच्या आहेत. एस.टी.बस स्थानकात बसण्याची धड व्यवस्था नाही. एस.टी. बस सुटण्याच्या अथवा बस उशीराने सुटणार असल्याची सुचना देण्याचे काम केले जात नाही. दापोली एस.टी. आगारातील कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना आणि त्यांचे अंतर्गत राजकारणाच्या वादाचा थेट परिणाम हा वाहतुक व्यवस्थेवर होत असून याचा नाहक त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागत आहे. लांब पल्ल्याच्या ठिकाणी नादुरूस्त बसेस सोडल्या जात असल्याने अशा बसेस अनेकदा वाटेतच बंद पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी जाण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यात प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन खाते आहे. त्यांच्याच पक्षाचे उदय सामंत पालकमंत्री आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांचेच सहकारी योगेश कदम हे दापोलीचे आमदार आहेत तरी सुध्दा जर दापोलीतील एस.टी. आगाराच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांची ससेहोलपट होत असेल तर मग लोकांसाठी हेच का तुमचे सुशासन अशाप्रकारच्या संतप्त प्रतिक्रीया प्रवाशांकडून रागाने उमटत आहेत.

पहाटे 5.30 वाजता दापोली एस.टी.स्थानकातून बोरीवलीला जाणाऱ्या एस.टी. बसची गुरूवारी तिकिट बुक केली होती. साडेपाच वाजून गेले तरी बस सुटेना म्हणून चैकशी केली तर बस थोडयाच वेळात लागेल असे सांगण्यात आले. हेच उत्तर 3 वेळा मला देण्यात आले. त्यानंतर बोरीवलीला जाण्यासाठी सुटणारी बसच रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आणि आमची व्यवस्था मुंबईला जाणाऱ्या एस.टी. बसमध्ये करण्यात ही बस नियमित वेळेपेक्षा तब्बल 1.30 तास उशीरा सुटली. माझे मुंबईतील काम केवळ बसच्या दिरंगाईमुळे झाले नाही त्याची जबाबदारी दापोली एस.टी.आगार प्रशासन घेणार का? अशाप्रकारची संतप्त प्रतिक्रीया दापोली मुंबईचे समाजसेवक अनंत फिलसे यांनी दुरध्वनीवरून बोलताना दिली.