बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या सार्थकच्या कुटुंबीयास 15 लाखांची मदत जाहीर

पाथर्डी तालुक्यात बिबटय़ाने नागरी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या घटनेची वनमंत्री संजय राठोड यांनी दखल घेतली असून, बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, बिबटय़ाला पकडण्याचा आदेश वन विभागाच्या अधिकाऱयांना दिला आहे. त्यासाठी यावल, जळगाव, नाशिक येथील पथके नगर वन विभागाच्या मदतीसाठी येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

पाथर्डी तालुक्यात गेल्या काही दिवसांत बिबटय़ाने मानवी वस्तीत येऊन हल्ले करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. काल पाथर्डी तालुक्यातील शिरपूर गावअंतर्गत पानतासवाडी शिवारात तारकनाथवस्तीवरील सार्थक बुधवंत या तीन वर्षांच्या मुलाला बिबटय़ाने पळवून नेल्याची घटना घडली. त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी सार्थकचा शोध घेतला. मात्र, नंतर त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळे बिबटय़ाला पकडण्याची मागणी होत होती.

वन विभागाच्या अधिकाऱयांनी तत्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने या परिसरात शोधमोहीम राबविली. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि कृषिमंत्री दादा भुसे यांनीही वनमंत्री राठोड यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. त्यावर वनमंत्री राठोड यांनी बिबटय़ाला पकडण्याचा आदेश दिला. यासाठी स्थानिक नागरिकांनीही वन विभागाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

सोमवारपर्यंत बिबटय़ाचा बंदोबस्त करा!

आमदार मोनिका राजळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. तसेच मढी, केळवंडी, शिरापूर, वृद्धेश्वर, रांजणी आदी गावांतील ग्रामस्थांनी सोमवारपर्यंत बिबटय़ाचा बंदोबस्त करावा; अन्यथा पाथर्डीत ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा दिला आहे.

ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा

आधी बिबटय़ाचा बंदोबस्त करा. त्याशिवाय आम्ही सार्थकवर अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका शिरापूर येथील ग्रामस्थांनी घेतली. मात्र, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर सायंकाळी उशिरा सार्थकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामस्थांनी या परिसरात बिबटय़ाचा वावर असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱयांना कळविले होते. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही, असे सांगत वन विभागाच्या अधिकाऱयांविषयी तक्रारींचा पाढा वाचला. यानंतर प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा उपवन संरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी यांना सूचना केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या