
सामना प्रतिनिधी, मुंबई
दिवाळी अंकांची समृद्ध परंपरा जपताना, अंक कितीही महागले तरी खरेदी करण्याचा नियमित वाचकांचा कल यंदाही कायम दिसून येत आहे. दिवाळी अंकांच्या किमतीत 10 ते 15 टक्क्यांची वाढ होऊन ते 100 रुपयांपासून 400 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. सुमारे 300 ते 350 अंक बाजारात विक्रीसाठी आले आहेत. कागदाच्या किमती वाढणे, छपाई महागणे आणि जाहिराती कमी झाल्याने दरवर्षी येणारे काही अंक या वर्षी बंद झाले आहेत.
दिवाळी अंक विक्रेते आणि वितरक यांनी मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक पडलेला नसल्याचे सांगितले आहे. दसऱयापासून अंक मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली असून आतापर्यंत 5 ते 10 टक्के अंकच यायचे शिल्लक आहेत. आयडियल बुक डेपोच्या दिवाळी अंक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘कालनिर्णय’, ‘धनुर्धारी’, ‘जत्रा’, ‘चारचौघी’, ‘मानिनी’, ‘किस्त्रीम’, ‘माहेर’, ‘धनंजय’ आदी अंकांना चांगली मागणी आहे. त्यांनी पारंपरिक वाचक टिकवून ठेवले आहेत.
‘नवल’, ‘हंस’, ‘मोहिनी’ यांच्या किमती 400 रुपये इतक्या आहेत. आयडियल बुकने विक्री वाढवण्यासाठी सवलतही जाहीर केली आहे. 1 ते 5 अंक खरेदीवर 10 टक्के, 6 ते 19 अंकांच्या खरेदीवर 15 टक्के आणि 20 पेक्षा अधिक अंकांच्या खरेदीवर 20 टक्के सवलत दिली आहे. अंकांच्या किमती वाढल्याने मागणी काहीशी घटल्याचे दिवाळी अंकांचे प्रमुख वितरक असलेल्या बागवे एजन्सीचे राजेंद्र बागवे यांनी सांगितले. विविध वाचनालये, ग्रंथालये, संस्था यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे अंकांसाठी नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. आणखी 15 दिवस अंकांचे मार्केट सुरू राहील, असेही ते म्हणाले. ‘घरचा वैद्य’, ‘भाग्यसंकेत’, ‘दीर्घायुषी’, ‘वनौषधी’, ‘चारशब्द’, ‘गमभन’, ‘अपलम चपलम’ असे काही अंक यंदा बाजारात आलेले नाहीत.
summary- people loves to read traditional diwali ank


























































