
सामना प्रतिनिधी, मुंबई
आता औषध उपलब्ध नाही, तुझा मोबाईल नंबर दे, औषध आले की फोन करून कळवतो असे सांगत एका १७ वर्षीय मुलीचा फोन नंबर घेऊन नंतर तिला अश्लील मेसेज पाठवून त्रास देणाऱ्या भामट्याला गोवंडी पोलिसांनी गुजरातमध्ये जाऊन पकडले.
नरेश चौधरी (१९) असे या तरुणाचे नाव आहे. नरेश काही दिवसांपूर्वी चेंबूर येथील एका मेडिकल स्टोअर्समध्ये काम करीत होता. त्या मेडिकलमध्ये एक मुलगी औषध आणण्यासाठी गेली होती, मात्र तिला हवे असलेले औषध उपलब्ध नसल्याने नरेशने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि औषध आले की कळवतो असे म्हणाला. त्यानुसार मेडिकलमध्ये औषधाचा साठा आल्यानंतर नरेशने तिला फोन करून कळवले. मग त्या मुलीने मेडिकलमध्ये जाऊन औषध खरेदी केले. पण नरेशने मुलीने दिलेल्या मोबाईल नंबरचा दुरुपयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्याने चांगले मेसेज पाठवले. त्यानंतर मग अश्लील मेसेज पाठवून मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. नरेशचा त्रास वाढूच लागल्यानंतर मुलीने आपल्या वडिलांना ही बाब सांगितली. तिच्या वडिलांनी मेडिकल स्टोअर गाठून नरेशला दम भरला. याची गंभीर दखल घेऊन मेडिकलच्या मालकाने नरेशला कामातून काढून टाकले.
गुजरातमध्ये जाऊन पुन्हा मेसेज सुरू
त्यानंतर नरेशने गुजरात गाठले. सुरतमध्ये तो एका दुकानात काम करू लागला. काही दिवस शांत बसल्यानंतर त्याने पुन्हा त्या मुलीला अश्लील मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. मग तिने गोवंडी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने, पोलीस निरीक्षक चंद्रकांत बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी धायगुडे, अंमलदार जीतेंद्र आहिर, सुनील निंबाळकर या पथकाने सुरतमध्ये जाऊन नरेशच्या मुसक्या आवळल्या.
































































