व्हॉट्सअॅपवर मिळणार पीएफची माहिती, ईपीएफओ लवकरच आणणार खास सेवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटन अर्थात ईपीएफओ आपल्या खातेदारांसाठी एक खूपच सोपी आणि कामाची सुविधा सुरू करणार आहे. पीएफ खात्यासंबंधी माहिती आणि अपडेट्ससाठी ईपीएफओ एक व्हॉट्सअॅप सेवा सुरू करणार आहे. या नव्या सर्व्हिसमुळे पीएफ खातेदारांना पीएफची माहिती व्हॉट्सअॅपवर पाहता येईल, अशी माहिती केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

देशात मोबाईलवर व्हॉट्सअॅपचा वापर करणाऱ्यांची संख्या कोट्यवधी आहे. यामुळे ईपीएफओ या प्लॅटफॉर्मवर ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी करत आहे. या नव्या सर्व्हिस अंतर्गत ईपीएफओ सदस्य आपल्या अधिकृत आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअॅपवर केवळ हाय… हा मेसेज पाठवल्यानंतर खातेदारांना पीएफसंबंधी माहिती मिळेल. तसेच पीएफ सदस्यांना पीएफसंबंधी अपडेट्स मिळतील. यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सेवा अनेक भाषांत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

व्हॉट्सअॅप सेवा बहाल करण्यासाठी ईपीएफओ एक अधिकृत क्रमांक जाहीर करणार आहे. त्या क्रमांकावर हाय पाठवल्यावर ईपीएफओच्या सेवा सदस्यांना मिळतील. या सुविधेच्या माध्यमातून पीएफ बॅलेन्सची माहिती मिळवता येईल. मागील 5 व्यवहारांचा तपशील पाहता येईल.