
मुंबई महापालिकेच्या ‘आपला दवाखाना’ उपक्रमात उपचारांबरोबरच 147 प्रकारच्या मोफत चाचण्या करण्यात येतात. आता याच्या जोडीला लवकरच वृद्ध तसेच विविध आजारांमुळे त्रस्त किंवा अपघातग्रस्त व्यक्तींसाठी उपयोगी ठरणारी फिजिओथेरपी विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही विशेष तज्ञांची सुविधा सुरुवातीला घाटकोपर आणि माहीम या दोन ठिकाणच्या ‘आपला दवाखाना’त दिली जाणार असून पुढे टप्प्याटप्प्यात त्यात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुंबईतील महापालिकेच्या 24 वॉर्डमध्ये घराजवळ दवाखाना या संकल्पनेतून ‘आपला दवाखाना’ हा उपक्रम ऑक्टोबर 2022 पासून धारावीतून सुरू करण्यात आला. सध्या 202 ‘आपला दवाखाना’ सुरू असून 227 प्रभागांत एक अशा प्रकारे एकूण 227 प्रभागांमध्ये ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. मार्च अखेरपर्यंत ‘आपला दवाखाना’ची संख्या 250 वर नेण्याचा महापालिकेचा मानस आहे. यात प्राथमिक आरोग्य सुविधांबरोबच आता तज्ञांकडून दिल्या जाणाऱया विशेष आरोग्य सुविधांचाही टप्प्याटप्प्याने समावेश केला जाणार आहे. यात प्रथम फिजिओथेरपीचा समावेश केला जाणार आहे.
वैद्यकीय चाचण्यांची सुविधा
‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सकाळी 7 ते दुपारी 2 आणि दुपारी 3 ते रात्री 10 या कालावधीत कार्यरत असतात. यात मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी यासह 147 प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचबरोबर क्ष-किरण (एक्स-रे), सोनोग्राफी इत्यादी चाचण्यांसाठी पॅनलवरील डायग्नॉस्टिक पेंद्रांद्वारे महापालिकेच्या दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे तसेच विशेष तज्ञांच्या सेवादेखील पॉलिक्लिनिक व डायग्नॉस्टिक सेंटरद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
32 लाख 55 हजारांहून जास्त व्यक्तींनी घेतला लाभ
ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2023 पर्यंत तब्बल 32 लाख 55 हजार 826 जणांवर उपचार करण्यात आले आहेत. येत्या काळात दवाखान्यांमध्येही वाढ केली जाणार असून त्यामुळे प्राथमिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम होणार आहे. मार्च 2024 पर्यंत आणखी 48 ‘आपला दवाखाना’ मुंबईकरांसाठी उघडले जाणार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

























































