
परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे दीडशे वर्षांची परंपरा असलेला पापदंडेश्वराचा पालखी सोहळा मंगळवारी उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. ग्रामदैवत पापदंडेश्वराच्या पालखी सोहळ्याचे आयोजन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. गाढे पिंपळगाव येथे पापदंडेश्वर मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत अंकिता खांडगे यांची शिव कथा दुपारी 1 ते 5 वाजेदरम्यान आयोजन करण्यात आली होती.
या सप्ताहाची सांगता वार्षिक पालखी सोहळ्याने करण्यात आली. सोमवारी रात्री 12 वाजता फटाक्यांच्या आतिषबाजीने या पालखी सोहळ्याची सुरुवात झाली. पापदंडेश्वर मंदिरातून श्री पापदंडेश्वराची पालखी पापदंडेश्वर महाराज की जय, गुरुराज माऊलीच्या जयघोषात निघाली. श्रीपापदंडेश्वर महाराज पालखीचे गावातील रस्त्यावर सडा, रांगोळी काढून स्वागत करण्यात आले. पालखीचा कराड गल्लीत (लादनी पुढे) विसावा घेण्यात आला. याठिकाणी रात्रभर,चाकूर, अहमदपूर, मालेवाडी, आष्टी, वैद्यकिनी, सबदाराबाद येथील भारुडकारांच्या भारुडांनी मोठी रंगत आणली, सकाळी पाच वाजेपर्यंत ही भारुडे चालली.
भारुड गायनामध्ये महिला वारकऱ्यांनी गायलेल्या भारुडांनी सर्वांचे लक्ष वेधले. सकाळी पालखी मुख्य चौकात आल्यानंतर गवळणी व सोंगाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात समाजप्रबोधन पर सोंगे करण्यात आली. पालखी मार्गावर भजनी पावले, फुगडी उत्साहात खेळत होते, विशेष म्हणजे महिलाही यात सहभागी झाल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास पापदंडेश्वराची महाआरती करण्यात आली.नंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या भक्ती भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक भक्त व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




























































