
पेट्रोलियम पदार्थ माहुलहून रायगडला नेणाऱया पाईपलाईनला उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या पाईपलाईनसाठी तिवरांची कत्तल केली जाणार आहे. त्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. भारत पेट्रोलियम कंपनी ही पाईपलाईन टाकणार आहे. हा जनहितार्थ प्रकल्प आहे. त्यासाठी तिवरांची कत्तल करायला न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र महाराष्ट्र झाडे संरक्षण व संवर्धन कायद्या अंतर्गत कंपनीने परवानगी घेतलेली नाही. न्यायालयाने दिलेली परवानगी रद्द करावी, अशी मागणी करणारा अर्ज झोरू बथेना यांनी केला होता. आम्ही सर्व संबंधित विभागाच्या परवानग्या घेतल्या आहेत, असा दावा करत कंपनीने त्याचा तपशील न्यायालयात सादर केला. तो ग्राह्य धरत न्या. ए.एस. चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने बथेना यांचा अर्ज फेटाळून लावला. 43 कि.मी. पाईपलाईनचा मार्ग मोकळा झाला आहे.


























































