
सामना प्रतिनिधी । परभणी
परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशु शल्यचिकित्सा रुग्णालयात आज एका गायीच्या पोटावर शस्त्रक्रीया करुन पोटातील 50 किलोचा प्लॉस्टीक कचरा बाहेर काढला. शस्त्रक्रीया करताना पोटातील चप्पल, वाळू, दोन रुपयांचे दोन नाणे, एक खिळा, दोन तार, सेफ्टीपीन, गीट्टी, मोठादोर, अनेक कॅरीबॅगा आदी वस्तुही बाहेर काढण्यात आल्या. डॉ.गजानन ढगे व त्यांच्या सहकार्यांनी मागील तीन वर्षात प्रथमच इतकी मोठी व जटील शस्त्रक्रीया गायीच्या पोटावर यशस्वीपणे केली.
शहरातील प्रसिद्ध कंत्राटदार व प्रगतीशील शेतकरी राधाकिशन वाघमारे यांच्या मालकीच्या लालकंधारी जातीच्या गायीवर ही शस्त्रक्रीया झाली. पंधरा दिवसांपूर्वीच एका छानस्या गोऱ्याला जन्म दिल्यानंतर या गायीने दूध देणे बंद केले होते. गाय सुस्त झाली होती. तिच्या पोटात बद्धकोष्ठता झाली होती. बहुदा पोटात पोटसूळ उठल्याने तिला वेदना होत असल्याने ती दात खात होती. यामुळे राधाकिशन वाघमारे यांनी तातडीने या गायीला पशुचिकित्सा रुग्णालयात आज दाखल केले. डॉ. विलास आहेर, डॉ. नितीन मार्कण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रा.डॉ.गजानन ढगे, पदव्युत्तर विद्यार्थीनी चैत्राली आव्हाड, डॉ. स्वप्नील जाधव यांनी गायीला तपासून तातडीने शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तयारी करुन गायीच्या पोटावर शस्त्रक्रीया करुन 50 ते 55 किलोपर्यंतचा हा कचरा व घणकचरा बाहेर काढला.





























































