अशोक समेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

> शिल्पा सुर्वे

नाटककार, लेखक अशोक समेळ, येत्या 12 मे रोजी 81 व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. काही प्रतिभावंतांसाठी वय हा निव्वळ आकडा असतो. कारण त्यांच्या प्रतिभेला वयाच्या कुंपणाचे बंधन असू शकत नाही. अशोक समेळ हे त्यांच्यापैकीच एक. उत्साहाचे दुसरे नावच जणू अशोक समेळ!

तीन- चार वर्षांपूर्वी ’मी अश्वत्थामा चिरंजीव’ ही सातशे पानांची बृहत् कादंबरी लेखक, नाटककार अशोक समेळ यांनी लिहिलेली आहे. कादंबरीच्या प्रकाशनापासूनच तिची चर्चा होती. महाभारतातील महायोद्धा अश्वत्थामाचे चिरंजीव अस्तित्व उलगडण्याचा प्रयत्न समेळ यांनी केला आहे. महर्षी व्यासांच्या महाभारतातील दुर्लक्षित व्यक्तिरेखेवर लिहिलेली ही कांदबरी आहे. त्यासाठी समेळ यांनी भरपूर प्रवास आणि संशोधन केले. तेही वयाच्या पंच्याहत्तरीत. अगदी झपाटल्यासारखे त्यांचे काम सुरू होते… सारे थक्क करणारे होते!

या लेखाच्या निमित्ताने त्यांच्याशी काल बोलले तेव्हा त्यांनी मला पुन्हा एकदा थक्कच करून सोडले. सध्या काय सुरू आहे, असं विचारल्यावर, ‘द्रौपदी- काल, आज आणि उद्या’ ही कादंबरी लिहीत असल्याचे त्यांनी सांगून टाकले. समेळ यांची आणखी एक महा कादंबरी लवकरच वाचकांच्या हाती पडेल यात शंकाच नाही. याशिवाय त्यांचे गाजलेले ‘पिंजरा’ हे नाटक ‘पुन्हा पिंजरा’ या नावाने रंगभूमीवर आणण्याची या ऐंशी वर्षांच्या तरुणाची धडपड सुरू आहे. याशिवाय दररोज टेलिव्हिजनवर ते आपल्याला भेटत आहेतच… ‘यशोदा – श्यामची आई’ या मालिकेतील बापूआजोबांच्या रूपाने! या वयात तुमच्या उत्साहाचे रहस्य काय, असे विचारल्यावर ते पटकन सांगून टाकतात, माझी पॉझिटिव्हिटी! आयुष्याकडे सकारात्मक बघण्याची दृष्टी! मी कधी कसली तक्रार करत नाही. कदाचित त्यामुळे मी वर्षानुवर्षे चार्ज राहतोय.

खरंच आहे, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा हा दृष्टिकोन सर्वांना आदर्श वाटावा, असाच आहे. समेळ गेली पाच दशके नाटक, मालिका, लेखन क्षेत्रांत आपली मोहोर उमटवून आहेत. नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता अशी बहुरंगी कामगिरी बजावणाऱया समेळांशिवाय रंगभूमीचा इतिहास अपुराच राहील.

ऐंशीच्या दशकांत समेळ यांनी ‘पुत्रकामेष्टी’ या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर नट म्हणून पाय ठेवला. त्यावळे प्रभाकर पणशीकर, सुधा करमरकर या दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला, त्यातून एक रंगकर्मी म्हणून समेळ घडत गेले. ‘डोंगर म्हातारा झाला’ या अनिल बर्वे यांच्या कादंबरीवरून त्यांनी नाटक रंगभूमीवर आणले. त्यासाठी त्यांनी स्वतःची नाटय़संस्था स्थापन केली. ‘ऋग्वेद’ असे या नाटय़संस्थेचे नाव आहे. मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी ‘पिंजरा’ हे दुसरे नाटक केले. हे नाटक रॉबर्ट ब्लॉच यांच्या ‘सायको’ कादंबरीवरून लिहिले होते. या नाटकात पद्मा चव्हाण यांची प्रमुख भूमिका होती. नाटक तुफान चालले. हे नाटक गुजराती रंगभूमीवर गेले. पुढे समेळ आणि गुजराती रंगभूमी हेदेखील समीकरण बनले. त्यांनी 27 व्यावसायिक गुजराती नाटकं केली. डोंगर म्हातारा झाला, कुसुम मनोहर लेले, शपथ तुला जिवलगा, तीच सांगू शकेल, शपथ तुला, तीस वर्षांनंतर, तू आहेस तरी कोण, अशी त्यांची मराठी व्यावसायिक नाटकं खूप चालली. त्यांनी लिहिलेले ’कुसुम मनोहर लेले’ नाटक तर ‘पुछे छे डिकरी’ नावाने रंगभूमीवर आले. या नाटकाने 100 दिवसांत शंभर प्रयोग करून गुजराती रंगभूमीवर विक्रम केला. स्वामी विवेकानंद यांच्या आयुष्यावरील ‘संन्यस्त ज्वालामुखी’ हा त्यांच्या कलाजीवनातील महत्त्वाचा टप्पा. यामध्ये त्यांचा मुलगा संग्राम समेळ याने स्वामी विवेकानंद यांची भूमिका केली. याशिवाय समेळ यांनी अनिल बर्वे यांच्या कादंबरीवरून ‘युद्धविराम’, ‘अकरा गोटी गॅलन पाणी’, ‘होरपळ’ तसेच रणजित देसाई यांच्या कादंबरीवरून ‘राजा रविवर्मा’ ही प्रायोगिक नाटकं लिहिली. आकडय़ांच्या संख्येत त्यांच्या कारकिर्दीविषयी लिहायचं, तर 9 प्रायगिक नाटकं, 21 मराठी व्यावसायिक नाटकं, 27 व्यावसायिक गुजरात नाटकं, 10 नाटकांची निर्मिती, सहा चित्रपटांचे लेखन, टेलिव्हिजन मालिकांच्या 2000 हून अधिक भागांचे लेखन, मराठी, गुजराती, हिंदी नाटकांत, चित्रपटांत, मालिकांत अभिनय, दिर्ग्दशन… आणि हो तीन महाकादंबरीचे लेखन आहेच. मी अश्वत्थामा चिरंजीव (2015), सप्तचिरंजीव (2017), ते आभाळ भीष्माचं होतं (2022) या कादंबऱया आणि ‘स्वगत’ हे प्रामाणिक आत्मचरित्र. आजवर अनेक पुरस्कारांनी समेळ यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान झालाय. संवेदनशील नाटककार, जिद्दीचा लेखक- संशोधक, नवोदितांचे मार्गदर्शक अशा भूमिका ते आजही निभावत आहेत. सकारात्मकतेचा संदेश वाटत आहेत आणि सगळ्यांना जिंकून घेत आहेत… ही वाटचाल अशीच सुरू राहो.