बिहारमध्ये काहींचे ‘जंगलराज’, विरोधकांचा विकासनिधीवर डोळा- पंतप्रधान मोदी

बिहारमध्ये काहींनी ‘जंगलराज’ बनवले असून त्यांचा राज्याच्या विकासावर नाही तर विकासनिधीवर डोळा आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेला अशा प्रवृत्तींविरुध्द मतदान करा असे आवाहन केले. मतदानाला जाताना ‘मास्क’ घालून जा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून मतदान करा असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या बिहारमध्ये आज तीन ठिकाणी सभा झाल्या. त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हेसुद्दा होते. राजद-काँग्रेस आघाडीचा नामोल्लेख टाळत मोदी यांनी काही मंडळी बिहारला लूटण्याचे काम करत आहेत आणि त्यांच्यामुळे सामान्य नागरिक आणि आपल्या माताभगिनींना जगणे कठीण झाले आहे अशी टीका केली.

माता सीता यांच्या मिथिला नगरीत आपण आलो आहोत असे सांगताना मोदी यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्यावरूनही विरोधकांना लक्ष्य केले. आम्हाला राम मंदिराच्या निर्माणाची तारीख विचारणाऱयांवर आता कौतुकासाठी टाळ्या वाजवण्याची वेळ आली असे ते म्हणाले.

बिहारमधील एनडीए आघाडीत भाजपा, जनता दल युनायटेड, व्हीआयपी आणि एचएएम यांचा समावेश आहे असे सांगत नितीश कुमार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी उल्लेख केला.

आपली प्रतिक्रिया द्या