
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईवडिलांवरून काँग्रेसने केलेल्या टीकेला आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत त्यांना फक्त एकाच घराण्यातील नावे माहित आहेत. काँग्रेसमधील या घराणेशाहीने इतर महत्वाच्या नेत्यांचे योगदान मुद्दाम कमी केल्याचा आरोपही त्यांनी केला. एकाच घराण्यातील नावे माहित असल्याने त्यांना इतरांच्या वडिलांचे नाव माहित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे सांगत त्यांनी महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वडिलांचे नाव काय असा सवालही केला. काँग्रेसमध्ये सर्वसामान्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी मिळत नाही. या पक्षासाठी एकाच घराण्याचे नाव हा ब्रँड आहे. तेच त्यांच्यासाठी महत्वाचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जेटली यांनी फेसबुकवर ब्लॉग लिहून काँग्रेसवर टीका केली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव काय, सरदार पटेल यांच्या वडिलांचे नाव काय, सरदार पटेल यांच्या पत्नीचे नाव काय असे तीन सवाल केले आहेत. या प्रश्नांचे उत्तर कोणालाही देता आले नाही. यामागे काँग्रेसचे घराणेशाहीचे राजकारण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधी यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि अहिंसेचे तत्व जगभरात पोहचले आहे. मात्र, काँग्रेसने त्यांचे महत्व कमी करून फक्त एका घराण्याचे महत्व लोकांच्या मनावर बिंबवले. देशातील शाळा, कॉलेज, महाविद्यालये, रस्ते, विमानतळ, रुग्णालये यांना या एकाच घराण्यातील व्यक्तींची नावे देण्यात आली. सरदार, पटेल, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महान नेत्यांचे महत्व जाणूनबुजून कमी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा गांधी यांच्या वडिलांचे नाव करमचंद उत्तमचंद गांधी होते. सरदार पटेल यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई पटेल आणि पटेल यांच्या पत्नीचे नाव दिवाली बा होते. मात्र, त्यांचा फोटो किंवा इतर कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले.
पंडित नेहरूंनी इंदिरा गांधी यांच्याकडे सत्ता सोपवून घराणेशीहीची सुरुवात केली. हे घराणेशाहीचे राजकारण देशाला घातक ठरले आहे. काँग्रेसच्या घराणेशाहीचा वारसा इतर पक्षांनीही उचलला. त्याचे तोटे आज दिसत आहेत. या पक्षामध्ये लोकशाही पद्धती नसते. फक्त एकाच घराण्यात सत्तेची सूत्रे राहतील अशा पद्धतीने फूटीचे राजकारण करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.






















































