मी चौकीदार आहे, चौकीदार अन्याय करत नाही- पंतप्रधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो: पीटीआय

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मेरठमधून प्रचाराला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत आपल्या सरकारने पाच वर्षात केलेल्या सर्व कामांचा हिशोब देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपण चौकीदार आहोत आणि चौकीदार कधीही अन्याय करत नाही असेही त्यांनी सांगितले. 2019च्या निवडणूक प्रचाराची सुरुवात मेरठपासूनच सुरू करण्यामागे एक कारण असल्याचे ते म्हणाले. 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामाची सुरुवात झालेले हे ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवात करण्यासाठी या शहराची निवड केल्याचे ते म्हणाले.

ही निवडणूक ही प्रत्येक हिंदुस्थानीच्या मनात असलेला सशक्त हिंदुस्थानाशी संलग्न असलेली आहे. हिंदुस्थान आणि त्याचे 130 कोटी नागरिक आता पुन्हा मोदी सरकार यावं, अशी प्रबळ इच्छा बाळगत आहेत. सगळ्या जगाला 2019 चा जनादेश पाहायचा असेल तर या सभेला जमलेली गर्दी पाहावी,असे सांगत त्यांनी उपस्थितांचे आभआर मानले. पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडून आशीर्वाद मागितले, तुम्ही मला प्रेम दिलंत. त्या जोरावरच पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वासही मोदी यांनी व्यक्त केला. मोदी यांनी पुलवामा आणि सुकमा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजलीही वाहिली. पाच वर्षात आपल्या सरकारने केलेल्या प्रत्येक कामाचा हिशोब देणार आहे. पाच वर्षांपूर्वी तुम्ही दाखवलेल्या विश्वासाची व्याजासह परतफेड करणार असल्याचेही ते म्हणाले. साऑ वर्षांच्या काळात तुमच्या सरकार असताना तुम्ही अपयशी का ठरलात, देशाचा विश्वासघात का केलात, असा सवालही त्यांनी विरोधकांना केला. आज एकीकडे विकासचा ठोस मुद्दा आहे, तर दुसरीकडे नीती, नियत आणि विचार यांचा काहीही पत्ता नाही. फक्त मोदीविरोधासाठी ते एकत्र आले आहे. त्यांची कोणतीही विचारधारा नाही. कोणताही किमान समान कार्यक्रम नाही. भ्रष्टाचार संपवणारे सरकार त्यांना नको आहे. दमदार चौकीदार नको आहे. मोदी हटाओ या एकाच ध्येयाने ते एकत्र आल्याचा आरोप मोदी यांनी केला. एकीकडे दमदार चौकीदार आणि दुसरीकडे दागदार भरले आहेत. एकीकडे नवीन हिंदुस्थानचे संस्कार आहेत तर दुसरीकडे वंशवाद आणि भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे. एकीकडे निर्णयक्षम सरकार आहे तर दुसरीकडे दशकानुदशके निर्णय टाळणारा इतिहास आहे. आता निवड तुम्हाला करायची आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.

या देशाने फक्त नारेबाजी करणारी सरकार पाहिली आहेत, पण आता पहिल्यांदाच निर्णयक्षम सरकार पाहत आहे. ज्या देशात श्रमाचा, कामाचा, देशाच्या लेकींचा, देशातील प्रत्येक वर्गाचा, देशाच्या अभिमानाचा सन्मान असेल. ज्या देशात साधनांची , ज्ञानविज्ञानाची, संस्कृती आणि विचार, आचार यांची समृद्धी असेल. ज्या देशात दहशतवाद, देशाच्या शत्रूंपासून, भ्रष्टाचार, रोगराई यापासूंन सुरक्षा मिळेल. एक असा देश ज्यात सुरक्षा, समृद्धी आणि सन्मानाचे संस्कार असतील. आमचं लक्ष्य नवीन हिंदुस्थानाच्या निर्मितीचं आहे, असा देश जो आपल्या गौरवशाली इतिहासासारखाच वैभवशाली असेल. नव्या हिंदुस्थानच्या निमिर्तीसाठी तुमच्या सक्रीय सहकार्याची गरज आहे, असेही मोदी म्हणाले. जमीन, आकाश, अवकाश या तिन्ही क्षेत्रात आपण आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे. एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईकद्वारे आपण शत्रूला वचक बसवला आहे.

जे गेल्या 70 वर्षांत गरीबांची बँक खाती उघडून देऊ शकले नाहीत, आज तेच खात्यात पैसे टाकायची भाषा करत आहेत. जेव्हा जनधनची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा काही बुद्धिमान लोक म्हणत की, देशात इतक्या बँकाही नाहीत, ग्रामीण माणूस काय करणार, देशातील 34 कोटी गरीबांसाठी जनधन योजनेतंर्गत बँक खाती उघडून देण्यात आली. देशातील 50 कोटी गरीब कुटुंबाना दरवर्षी पाच लाखांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचारांची सुविधा मिळत आहे. देशातील तब्बल 12 कोटी शेतकऱ्यांना 75 हजार कोटींची थेट वार्षिक मदतही सरकारने केली.
चाळीस वर्षांपासून सैनिक वन रँक वन पेन्शनची मागणी करत होते. तेही या सरकारने करून दाखवले आहे. अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित समस्या सरकारने सोडवल्या आहेत. 11 एप्रिल रोजी जेव्हा देश पहिल्यांदा मतदान करेल, त्यावेळी प्रथम मतदान करणारा तरुण विकासाचं हे चित्र पाहूनच कमळाच्या चिन्हासमोरचं बटण दाबणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सबका साथ, सबका विकासच्या विचारांवरच नवीन हिंदुस्थानची निर्मिती होत आहे. देशातील असा कोणताही प्रदेश नाही, कोणतीही अशी व्यक्ती नाही, जी या विकासापासून अस्पर्शित राहिला आहे. देशातील इमानदार करदात्यांना 5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आयकरमुक्त करण्याचं कामही सरकारने करून दाखवलं. गरीब सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्याचं कामही याच सरकारने केलं. 15 कोटी तरुणांना कर्ज देऊन स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्याचं काम आमच्या सरकारने केलं. देशातील अडीच कोटींहून अधिक घरांना वीज मिळाली. देशातील दीड कोटींहून अधिक बेघर कुटुंबांना स्वतःची पक्की घरंही आम्ही उपलब्ध करून दिली. देशभरात 10 कोटी गरीब कुटुंबासाठी शौचालय उपलब्ध करून देऊन माता बहिणींना सन्मान मिळवून देण्याचं सौभाग्यही आम्हाला मिळालं आहे. सरकारने देशातील सात कोटी महिलांना गॅस उपलब्ध करून दिला. पंतप्रधानांनी गेल्या पाचट वर्षात सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती जनतेला दिली.

कोणताही राजकीय, आंतरराष्ट्रीय दबाव या चौकीदाराला त्याच्या ध्येयापासून दूर करू शकणार नाही, असेही मोदी यांनी सांगितले. तुम्ही शांत राहा, कारण मी माझ्या देशासाठी माझं सर्व काही उधळून द्यायला तयार आहे. 26 फेब्रुवारीला झालेलं मिशन चुकलं असतं तर लोकांनी माझे पुतळे जाळले असते, मला काळे झेंडे दाखवण्यात आले असते. माझ्यावर सडकून टीका झाली असती, माझा राजीनामा मागितला गेला असता. मात्र, आता 26 फेब्रुवारीचा विचार करूनही अनेक दहशतवाद्यांना कापरं भरलं आहे. माझ्या देशाचे सपूत हेच माझ्या देशाचे सबूत आहेत. जे सबूत मागतात तेच सपूतला आव्हान देतात. तुम्हाला सबूत हवाय की सपूत हवाय असा सवालही त्यांनी जनतेला केला.

आता आधीच्या भ्रष्ट सरकारला एकजरी संधी मिळाली तर पुन्हा आपण 2014 आधीच्या स्थितीत जाऊ. हे सगळं मी तुम्हाला सांगण्याचं कारण गेल्या पाच वर्षांपासून आपण देशाला ज्या प्रकारे मजबूत करत होतो, तेच आता पुढेही करायचं आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकार आल्यानंतर राज्यात जनता सुरक्षित आहे. मेरठ आणि उत्तर प्रदेशच्या जनतेने आधीच्या सरकारमुळे खूप सहन केलं आहे. यांच्या (काँग्रेस) सरकारमध्ये गुंड, बदमाश बेलगाम फिरत होते. देशाच्या लेकींना न्याय मिळत नव्हता. विरोधक भ्रष्टाचार करण्यासाठी वाटेल ती पातळी गाठू शकतात. 2014पूर्वी जे भ्रष्ट सरकार दिल्लीत होतं, तेव्हा देशात बॉम्बस्फोट होत होते. आपल्या चौकीदाराच्या सरकारने केलेले काम पूर्वीच्या देशातील स्थितीशी तुलना केल्यावर दिसून येईल असेही ते म्हणाले.