
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच त्याने पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट देण्यात आले. मात्र हे फार आश्चर्यकारक वाटत नाही, त्यांना राज्यसभेवर धाडण्यात येईल हे अपेक्षित होते, आशा प्रतिक्रिया शिंदे समर्थक देत आहेत. शिंदे यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला मध्यप्रदेशात बळकटी येईल असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. गेल्या काही काळापासून शिंदे यांना काँग्रेस मधून साइड ट्रॅक करण्यात येत होते. मोदी सरकारच्या काही निर्णयांना शिंदे यांनी काँग्रेस पेक्षा वेगळी भूमिका घेत आपली दिशा स्पष्ट केली होती. त्यामुळे अखेर त्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला.
भाजप मध्ये प्रवेश करण्यापूर्वी शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली. पण शिंदे हे भाजप मध्ये नसले तरी मोदी यांच्या परिवाराशी त्यांचा सासरकडून संबंध होता. या नात्यातूनच शिंदे भाजपच्या जवळ गेले असावेत असा अंदाज इंडिया टुडे च्या वृत्तात म्हटले आहे.
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी मोदी वाराणसी सोबत वडोदरा म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या सासुरवाडीतून दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी वडोदरा येथील जागा सोडली. ‘स्वराज्य’च्या वृत्तानुसार प्रियदर्शनी शिंदे यांच्या कुटुंबाशी मोदींच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.
मोदी मुख्यमंत्री असताना देखील प्रियदर्शनी यांचे कुटुंबीय मोदींची अनेकदा भेट घ्यायचे. मोदी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरताना देखील बडोदा येथील गायकवाड यांच्या राजघराण्यातील शुभांगीनी गायकवाड या प्रस्तावक म्हणून उपस्थित होत्या. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपमध्ये आणण्यामागे देखील शुभांगीनी गायकवाड यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
























































