आता घरोघरी लसीकरण; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राज्यांना मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लसीकरणाच्या मोहिमेला अजून वेग द्यायचा आहे. आता ‘हर घर टीका, घर घर टीका’ या मोहिमे अंतर्गत लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. लसीचे 100 कोटी डोस झाल्यानंतर देशात शिथिलता आली तर दुसरे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे ज्या घरात अद्याप लोकांनी लसीचे दोन डोस घेतलेले नाहीत, अशा प्रत्येक घराचे दार ठोठवा आणि लसीकरण करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विविध राज्यांतील जिल्हाधिकाऱयांना दिले.

पंतप्रधान मोदी यांनी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे अशा जिह्यांतील जिल्हाधिकाऱयांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या वेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मंडाविया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. 40पेक्षा जास्त जिह्यांचे दंडाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते. या वेळी नरेंद्र मोदी म्हणाले, लसीच्या पहिल्या डोसप्रमाणे दुसऱया डोसलाही तितकंच गांभीर्याने घेण्याची विनंती मोदींनी देशातील जनतेला केली. लसीचे 100 कोटी डोस झाल्यानंतर देशात शिथिलता आली तर दुसरे संकट निर्माण होऊ शकते.

धर्मगुरूंची मदत घ्या!

कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल पसरवल्या जाणाऱया अफवा  दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर धर्मगुरूंना सहभागी करून घ्या. आजार आणि शत्रूला कधीही कमी लेखू नका. त्यांच्याशी शेवटपर्यंत लढावं लागतं, असे सांगताना पंतप्रधानांनी आशा कर्मचाऱयांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, तुमच्या मेहनतीमुळे आजपर्यंत इथवर प्रगती करणं शक्य झालं आहे. आशा कर्मचाऱयांनी भरपूर काम केले आहे. अनेक मैल अंतर चालून, दुर्गम भागापर्यंत लसीकरण पोहोचवलं.

महाराष्ट्राने दिली ‘‘मिशन कवचकुंडल’ अभियानाची माहिती

संभाजीनगर जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने या ठिकाणी येणाऱया पर्यटकांमध्ये विश्वास वाढावा यासाठी पर्यटनाशी संबंधित क्षेत्रातील सर्व व्यक्तींचे मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करावे, असे निर्देश पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संभाजीनगर जिह्यात विविध उपक्रम राबवून लवकरच संपूर्ण जिह्यात लसीकरण पूर्ण करणार असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन कवचकुंडल अभियान’ राबवून लसीकरण वाढविले आहे. ‘मन में है विश्वास’ हा  कोरोनाविरुद्धच्या लढाईत मनोबल वाढविणारा उपक्रम आम्ही राबविला. या कार्यक्रमात विविध धर्मांचे धर्मगुरू उपस्थित होते तसेच आर्मीचादेखील सहभाग होता. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करणाऱया पहिल्या 25 गावांना विशेष निधी देण्यात येणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागासाठी ‘मेरा वार्ड सौ प्रतिशत टीकाकरण वार्ड’, ‘संतांची भूमी शंभर टक्के लसीकरण भूमी’ असे वेगवेगळे प्रयोग करून जिह्यात लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या वेळी सांगितले.