पंतप्रधान मोदींचा गुजरात दौरा; एक हजार कोटींचे पॅकेज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘तौकते’चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. पंतप्रधानांनी हवाई पाहणी करून उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली आणि गुजरातच्या वादळग्रस्त भागासाठी एक हजार कोटी रूपयांच्या तातडीच्या मदत पॅकेजची घोषणा केली. दरम्यान, या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि गोवा या राज्यांनाही बसला आहे.

पंतप्रधान मोदी यांचे दुपारी भावनगर येथे आगमन झाले. त्यानंतर विशेष हेलिकॉप्टरमधून पंतप्रधानांनी गिर-सोमनाथ, भावनगर आणि अमरेली या वादळाचा फटका बसलेल्या जिल्हय़ांची हवाई पाहणी केली. तसेच दिव येथीलही पाहणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री विजय रूपाणी त्यांच्या समवेत होते. हवाई पाहणीनंतर पंतप्रधानांनी नुकसान आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री रूपाणी यांच्यासह गुजरातचे मुख्य सचिव अनिल मुकीम, अतिरिक्त मुख्य सचिव पंकज कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते.  यावेळी पंतप्रधानांनी एक हजार कोटी रुपयांच्या तातडीच्या मदतीची घोषणा केली. याशिवाय देशभरात चक्रीवादळात जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या कुटुंबियांना 2 लाख रूपये तर जखमी झालेल्यांना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, चक्रीवादळाचा फटका बसलेल्या गुजरातमधील भागाचा आढावा घेण्यासाठी केंद्राचे पथक पाठविले जाणार अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

केंद्र सरकार राज्यांच्या संपर्कात

या दौऱयावर पंतप्रधान मोदी यान ट्विट केले आहे. आज गुजरात आणि दिवमधील स्थितीची हवाई पाहणी केली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या सर्व राज्यांच्या संपर्कात केंद्र सरकार आहे. या राज्यांबरोबर केंद्र सरकार काम करीत आहे असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रात मोठा फटका

  • ‘तौकते’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला मोठा फटका बसला आहे. कोकणसह मुंबई, ठाण्याला या वादळाने झोडपून काढले. किनाऱयावरील अनेक बोटींचा चक्काचूर झाला. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. एकटय़ा रायगड जिल्हय़ात सहा हजार घरांचे नुकसान झाले. कोकणात आंबा, नारळ, सुपारीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. हजारो झाडे कोसळली, शेकडो विज खांब उन्मळून पडले आहे. महाराष्ट्रात किमान एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  • महाराष्ट्रातून हे वादळ गुजरातला गेले. गुजरातसह गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळातही नुकसान झाले आहे. पाच राज्यांत 23 जणांचा बळी गेला आहे.