
‘प्रगतीचा महामार्ग’ अशी ओळख असलेला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आत बेशिस्तीचा महामार्ग झाला आहे. या मार्गावरून दररोज लाखो-हजारो गाडय़ा धावत असून अनेकजण वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत असल्याचे समोर आले आहे. परिवहन विभागाने गेल्या पाच महिन्यांत नियम मोडणाऱया तब्बल 4 हजार 900 वाहनांवर कारवाई करत 7 कोटी 22 लाख रुपयांच्या दंडाचा दणका दिला आहे. यामध्ये सर्वाधिक बेफाम वेगाने गाडय़ा चालवणाऱयांची संख्या सात हजारांच्या घरात आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने वाहनांना कमाल वेगमर्यादा ताशी 80 किलोमीटर एवढी निश्चित करून दिलेली आहे. तसेच अवजड वाहनांनी लेनची शिस्त पाळावी, लेन कटिंग करू नये असे निर्देश दिले आहेत. मात्र वाहनचालकांकडून त्याचे पालन होत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबर 2022 पासून आतापर्यंत 6 हजार 983 वाहनांवर वेगमर्यादा ओलांडल्याने कारवाई केली आहे. तसेच लेन कटिंगप्रकरणी 6 हजार 441, सीटबेल्टशिवाय गाडी चालवल्याप्रकरणी 6 हजार 12 वाहनचालकांवर कारवाई केली आहे.
अनेक वाहने ना इन्शुरन्स, ना परमिटशिवाय धावतात
मुंबई-पुणे महामार्गाबरोबरच राज्यभरात अनेक वाहने ना इन्शुरन्स, ना परमिटशिवाय धावतात. त्यामुळे अपघात झाल्यास त्याची भरपाई कोणी करायची, असा प्रश्न उभा राहतो. गेल्या पाच महिन्यांत परिवहन विभागाने मुंबई-पुणे महामार्गावर 1436 इन्शुरन्स आणि 364 परमिट नसलेल्या वाहनांवर कारवाई केली आहे.

























































