
सांगलीतील काळीखण परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून सात तासांत या खुनातील मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, त्याने साथीदारांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली आहे.
प्रदीप राजू हंकारे (वय 23, रा. मिरज) असे मृत तरुणाचे नाव आहे. दत्तात्रय परशुराम सरगर (वय 28, रा. विजयनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. संदीप हंकारे याने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रदीप हंकारे याचा प्लंबिंगचा व्यवसाय होता. मंगळवारी सकाळी तो दुचाकीवरून कामानिमित्त घरातून बाहेर पडला. दिवसभर तो बाहेरच होता. रात्री नऊच्या सुमारास त्याने घरात आईला फोन करून उशिरा येणार असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या काही मित्रांनी घरी फोन केला.
प्रदीप दारू पिऊन मिरजेतील एका ठिकाणी पडला असून, त्याला घेऊन जा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी ‘त्याला ईदगाह मैदान परिसरात असणाऱ्या पाहुण्यांकडे सोडा, तो सकाळी उठून येईल’, असे सांगितले. दरम्यान, सांगलीतील काळीखण परिसरात एक मृतदेह पडलेला असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी याठिकाणी धाव घेतली असता खुनाचा प्रकार उघड झाला. मृतदेहाच्या खिशातील आधार कार्डवरून त्याची ओळख पटली.
बुधवारी सकाळी पोलिसांनी प्रदीपच्या घरच्यांना याची माहिती दिली. प्रदीप हंकारे याचा त्याच्या मित्रांनीच खून केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. तपासी पथकांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला. यामध्ये शहर विभागाचे उपअधीक्षक अजित टिके यांनी तपासाची चक्रे फिरवली. सायबर सेलच्या मदतीने मोबाईल लोकेशन कॉल डिटेल्स काढण्यात आली. तसेच, मिरज पोलीस ठाण्यातील डीबी पथकाची मदत घेण्यात आली. या तपासात दत्तात्रय सरगर याच्यावर संशय बळावला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली.
































































