कळंगुटमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 9 पर्यटकांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

गोव्यात समुद्रकिनारी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर कळंगुट पोलिसांनी मंगळवारी धडक कारवाई केली. कळंगुटमध्ये समुद्रकिनाऱ्यावर उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या 9 पर्यटकांना पोलिसांनी अटक केली. यातील दोघे कोल्हापूरातील आहेत. उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांचा गोव्याच्या पर्यटनाला फटका बसत आहे. त्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत धिंगाणा घालणाऱ्यांवर पर्यटकांवर कारवाई सुरु केली आहे.

कळंगुटचे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. कळंगुटमधील पदपथ, किनाऱ्यावर आणि वाहनतळावर दारू पिणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप पाटील आणि नारायण पाटील या कोल्हापुरमधील दोन पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबाद- आंध्रप्रदेशमधील तिरुपती गुड्डम, कपिल अंजानेलु, सतीश बाबू यांचा समावेश आहे. इतरजण कर्नाटकमधील असून त्यात सागर बेंतुर, राघवेंद्र मेघराज,रुद्रेश महेश आणि राजेश नागराजप्पा यांचा समावेश आहे. यापुढे सर्वत्र गस्त वाढवून असे प्रकार घडत असतील तर त्यावर कडक कारवाई केली जाईल असे, दळवी यांनी स्पष्ट केले आहे. 2018 मध्ये 35 जणांवर अशीच कारवाई कळंगुट पोलिसांकडून करण्यात आली होती.