बहुचर्चित मास्क जप्तीच्या प्रकरणावर पोलिसांनी टाकला पडदा, पाचही आरोपींची मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च 2020 मध्ये उघडकीस आणलेले 14 कोटींचे 3-प्लाय आणि एन 95 मास्क जप्त करण्याशी संबंधित एक प्रकरण मुंबई पोलिसांनी बंद केले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त परम बीर सिंग आणि तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काळात हे प्रकरण समोर आले होते. या मास्कचा माध्यमातून काळाबाजार झाला असल्याचा दावा यावेळी करण्यात आला होता.

शहर गुन्हे शाखेने हे प्रकरण ‘क’ समरी म्हणून वर्ग करून या प्रकरणावर पडदा टाकला आहे. गुन्हे शाखेने, फौजदारी प्रक्रिया संहिता किंवा CrPC च्या कलम 169 अंतर्गत, जप्तीच्या वेळी अटक केलेल्या पाचही आरोपींची मुक्तता केली आहे.

19 मार्च 2020 रोजी, गुन्हे शाखेच्या युनिट 9 ने अंधेरीतील सहार येथील कार्गो युनिटजवळील पाच-सहा गोदामांवर छापा टाकला. या छापेमारीत एकूण 14 कोटी रुपये किमतीचे 22 लाख 3-प्लाय मास्क आणि 3.25 लाख N95 मास्क जप्त केले. यावेळी परमबीर सिंग आणि अनिल देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या वांद्रे कार्यालयात याप्रकरणी पत्रकार परिषदेला घेतली होती. यावेळी त्यांनी मास्कच्या काळाबाजाराचे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केल्याचा दावा केला होता. याप्रकरणी पोलिसांनी बालाजी नाडर, शाहरुख शेख, गुलाम मुर्तुजा, मिहीर पटेल आणि आयुष बन्सल या पाच जणांना अटक केली होती. त्यांच्यावर आयपीसी कलम 420 अन्वये फसवणूक केल्याप्रकरणी आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

मात्र आता विविध साक्षीदारांच्या जबाबावरून निष्कर्ष काढण्यात आला की हे मास्क विविध कंपन्यांना निर्यात करण्यासाठी आणले होते. बँकॉक, चीन, यूएई, जपान आणि यूएसए येथे हे मास्क निर्यात केले जाणार होते. त्यावेळी देशात सगळीकडेच मास्कची तीव्र टंचाई होती आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सहार येथील गोदामांवर छापा टाकून हे मास्क जप्त केले होते. मात्र पोलिसांनी केलेली ही संपूर्ण कारवाई गैरसमजातून करण्यात आली असल्याचे पोलीस अहवालात म्हटले आहे.

सहार कार्गो युनिटजवळील विविध गोदामांमध्ये ज्या पाच-सहा निर्यातदारांनी त्यांचे 3-प्लाय आणि N95 मास्क ठेवले होते, त्यांचे मात्र यामुळे मोठे नुकसान झाले आहे. ते व्यावसायिक हे मास्क निर्यात करण्याची वाट पाहत होते. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांचा माल निर्यात होऊ शकला नाही. जप्त करण्यात आलेले बहुतेक मास्क सरकारकडे सुपूर्द करण्यात आले होते, विशेषत: सरकारी रुग्णालयांमध्ये त्यांचे मोफत वाटप केले गेले. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार काही लाख मास्क हाफकीन संस्थेला देखील पाठवण्यात आले होते.