
सामना प्रतिनिधी। नांदेड
नासिक शहरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आपल्या स्वःताच्या हाताने कॅमेऱ्यात कैद केलेल्या कुंभ मेळ्यातील छायाचित्रांचे प्रदर्शन उद्या 9 जानेवारी 2019 ते 15 जानेवारी 2019 दरम्यान मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आले आहे. सर्वानी या छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यावी आणि कुंभ मेळ्यातील अनेक प्रसंगांना पहावे असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले आहे.
सन 2003 च्या कुंभ मेळ्यात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक होते. तो कुंभ मेळा त्यांनी स्वःत पाहिला आणि त्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळला होता.पोलीस आयुक्त सिंगल यांना स्वःत छायाचित्रे काढण्याचा छंद आहे. तेव्हा त्यांनी हजारो छायाचित्रे काढली होती.असाच एक प्रसंग पुन्हा डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना सन 2015 मध्ये प्राप्त झाला.तेव्हा ते पोलीस महासंचालक कार्यालयात कार्यरत होते.त्यांना नासिक कुंभ मेळ्याच्या बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले.गोदावरीच्या घाटातील सर्व व्यवस्था त्यांनी नियोजीत केली.तेव्हाही त्यांनी हजारो छायाचित्रे काढली.आपल्या नोकरीच्या सुरुवातीच्या काळात श्री क्षेत्र त्रिम्बकेश्वर येथे त्यांनी काम केले होते. तेव्हापासूनच कुंभ मेळा हा त्यांच्या साठी अत्यंत आवडीचा विषय आहे.
कुंभ मेळ्यातील छायाचित्रीकरणातून त्यांनी अनेक रंग आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केले.त्यातून कुंभमेळा आणि त्यातील परंपरा चित्रीत केल्या.सध्या प्रयागराज येथे महाकुंभ पर्व सुरु आहे.यापार्श्वभूमीवर डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी आपण स्वःत चित्रित केलेल्या कुंभमेळा चित्रांचे प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा येथे सर्वांसाठी आयोजित केले आहे.9 जानेवारी 2019 ते 15 जानेवारी 2019 दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे छायाचित्र प्रदर्शन खुले राहणार आहे.































































