
सामना प्रतिनिधी, मुंबई
होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी रेल्वे प्रवाशांवर फुगे मारले जाऊ नयेत याबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना देण्यात आल्या आहेत. त्या दिवशी रेल्वे पोलिसांचे पथक साध्या वेशात रुळांलगत गस्त करणार आहेत.
होळीच्या काही दिवस अगोदरपासून रेल्वे रुळांलगतच्या झोपडपट्टय़ांमधून प्रवाशांवर रंग आणि पाणी भरलेले फुगे मारले जातात. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गानजीक बहुतांश झोपडपट्टय़ा आहेत. रेल्वेस्थानक परिसरात घातपातविरोधी चेकिंग करण्यात यावी अशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत. रंग आणि पाण्याने भरलेले फुगे प्रवाशांवर मारले जातील अशी ठिकाणे निवडून तेथे पोलिसांची पथके तैनात ठेवली जाणार आहेत. तसेच रेल्वे मित्र आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांशी समन्वय करून पोलीस बंदोबस्त करणार आहेत.
साध्या वेशात पोलिसांचे पथक तैनात केले जाणार आहे. जास्तीत जास्त पोलीस बंदोबस्त रेल्वे स्थानक परिसरात ठेवला जाणार आहे.
– पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त (पश्चिम रेल्वे)


























































