गृहखाते पोलिसांच्या जिवाशी खेळतेय! भंगारातली गाडी बंदोबस्ताला पाठवली आणि पलटी झाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारसू येथे बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला कशेळी येथे पलटी होऊन अपघात झाला. ही पोलीस व्हॅन सिंधुदुर्गातून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस खात्यात इतक्या जुन्या मेकची गाडी अजूनही वापरात कशी काय, की गृहखात्याला पोलिसांच्या जिवाशी खेळायचे आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे अपघात झालेली ही गाडी रत्नागिरी पोलिसांतून केव्हाच हद्दपार करण्यात आली होती. बंदोबस्तासाठी पोलिसांच्या गाडय़ा मागवण्यात आल्या होत्या. त्यात ही जुनाट गाडी सिंधुदुर्ग पोलिसांतून आली असल्याचे समजते. शिवाय इतक्या जुन्या गाडीवर असलेला चालक हा सक्षम होता का हाही प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यामुळे गृहखाते या 17 पोलिसांच्या जिवाशी कसे काय खेळू शकते, असा प्रश्न विचारला जात आहे.

अपघातग्रस्त गाडीतील सर्वच पोलिसांना दुखापती झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आता त्यांचा औषधोपचाराचा खर्च रिफायनरी कंपनी करणार की पोलीस प्रशासन करणार, असा सवाल केला जात आहे.