
मालवण समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने नजर ठेवण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी समुद्राला आलेल्या ओहटीवेळी दांडी पद्मगड दरम्यान तयार होणाऱ्या वाळू मार्गावर काही अतिउत्साही पर्यटकांनी आपल्या चारचाकी, दुचाकी गाड्या नेल्या होत्या. काही पर्यटक त्याच ठिकाणी समुद्रात उतरून समुद्रीस्नान करत होते. त्यांना समज देत पोलिसांनी समुद्रकिनाऱ्यापासून दूर केले.
डीवायएसपी विनोद कांबळे, तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण व कर्मचारी यांनी त्या ठिकाणी दाखल होत सर्व पर्यटकांना समज देत पर्यटकांच्या गाड्या त्या ठिकाणाहून बाहेर काढायला लावल्या. भरतीदरम्यान पाणी वाढल्यास त्या ठिकाणी अडकून पडण्याची शक्यता असते. पर्यटकांनी अतिउत्साहात वाळू मार्गावर गाड्या आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर समुद्रात लाटा उसळण्यास सुरवात झाली आहे. तरी पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी. लहान मुले खोल समुद्रात जाणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. यासह अन्य खबरदारी सूचना किनारपट्टी भागात गस्त घालून पोलीस व महसूल प्रशासनाच्या वतीने दिल्या जात होत्या. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक सर्व किनारपट्टी भागत लक्ष ठेवत आहेत. पर्यटकांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची असून त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात असल्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांनी सांगितले.

























































