प्रदूषणापासून संरक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाहन, औद्योगिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या हे आणि असे अनेक घटक या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. त्याचबरोबर वाढत्या बांधकाम प्रकल्पांमुळे, वाहनांची वाढती संख्या आणि त्यातून निघणारा धूर, औद्योगिक प्रदूषण आणि जिवाश्म इंधन, टाकाऊ वस्तूंमुळे जमा होणारा कचरा, मानवी वस्तीसाठी, सोयीसुविधांकरिता होणारी जंगलतोड या सगळ्यामुळे वायू प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे.

वायू प्रदूषणामुळे फुप्फुसाच्या कार्यात बिघाड होतो. यामुळे  अॅलर्जिक ब्राँकायटिस, दमा, सीओपीडी यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे आधीच अॅलर्जिक ब्राँकायटिस, दमा, सीओपीडी आणि विविध वायुमार्गाचे आजार असलेल्या रुग्णांना याचा अधिक त्रास होतो. प्रदूषणामुळे फुप्फुसांची वाढ खुंटते आणि भविष्यात श्वसनासंबंधी आजार होण्याचे प्रमाण वाढते. आमच्या ओपीडीमध्ये श्वसनमार्गासंबंधी विकारांनी पीडित रुग्णांची संख्या वाढत आहे. श्वासोच्छ्वासाचे आजार असलेले बरेच  नवीन रुग्ण उपचारांकरिता येत आहेत. आम्ही रुग्णाला योग्य फिटिंगच्या प्रदूषणविरोधी फेस मास्कचा वापर करण्यास सांगतो. यावर साधा तसेच योग्य फिटिंग नसलेला मास्क उपयुक्त ठरत नाही. कारण अशा मास्कमधून धूलिकण प्रवेश करू शकतात.

रुग्णाला श्वसनासंबंधी कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा लक्षणांमध्ये वाढ झाल्यास शक्य तितक्या लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्रवास करताना किंवा व्यायाम करताना वायू प्रदूषकांशी संपर्क टाळणे हा संरक्षणाचा उत्तम मार्ग आहे. प्रदूषणामुळे लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना श्वसनाचे आजार होऊ शकतात. याचे कारण म्हणजे PM 2.5, PM 10 आणि नायट्रोजन डायऑक्साइड म्हणजेच NO2 वाढल्याने आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतात. त्यामुळे दम्याची समस्या वाढत आहे. इतर श्वसनाच्या आजारांचा धोकाही वाढतो. यामध्ये प्रामुख्याने ब्राँकायटिस आणि फुप्फुसाच्या कार्यावरही विपरीत परिणाम होतो. फटाके फोडताना त्यातून निघणाऱया धुराचा व त्यातील विषारी घटकांचा गर्भातील बाळांवरही घातक परिणाम होत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. अस्थमा रुग्णांसाठी व लहान मुले तसेच ज्येष्ठांनाही फटाक्यांचा कानठळ्या बसवणारा आवाज व त्यातून घडून येणारे प्रदूषण हानीकारकच असते. हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे अनेकांना या प्रदूषणाचा त्रास होतो. अशा वेळी तुम्ही काही गोष्टींची विशेष काळजी घेतली तर नक्कीच तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होईल.

  • जर तुम्हाला प्रदूषणाचा त्रास होत असेल तर तुम्ही अशा वेळी प्रवास करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.
  • मास्क वापरणे जरी सक्तीचे नसले तरी संसर्गास प्रतिबंध करण्यासाठी, शारीरिक सुरक्षेसाठी मास्क वापरणे गरजेचे आहे.
  • प्रदूषणापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमची औषधं वेळेवर घेणे गरजेचे आहे.
  • तुम्हाला जर आधीपासूनच श्वसनाचे आजार असतील आणि बाहेर प्रदूषण असेल तर चुकूनही जास्त वेळासाठी बाहेरच्या वातावरणात फिरू नका. श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम नियमित करा.
  • दिवाळी प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक असेल याची काळजी घ्या.
  • प्रदूषणापासून आरोग्याचा बचाव करण्यासाठी आपल्या डाएटमध्ये व्हिटॅमिन ‘सी’चा समावेश करा. यासाठी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घेण्याची गरज नाही. याऐवजी तुम्ही हिवाळ्यातील संत्री, पेरूसारख्या फळांचे सेवन करा.
  • श्वासोच्छ्वासाच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने श्वसनमार्गात होणारी अस्वस्थता कमी होण्यास मदत होते. त्यामुळे  भरपूर पाणी प्या.
  • यांसारख्या गोष्टींची जर तुम्ही विशेष काळजी घेतली तर  हवेतील वाढत्या प्रदूषणाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही.

डॉ. चेतन जैन, (लेखक झायनोवा शाल्बी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल्स येथे फुप्फुसविकार तज्ञ आहेत)