संरक्षण तंत्रज्ञानातील पॉवर हाऊस

164

>> शैलेश माळोदे

डॉ. व्ही. के. आत्रे. संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार आणि इतरही अनेक पदे भूषविणारे संरक्षण तंत्रज्ञ.

सोअरिंग हाय ः एक बायोग्राफी ऑफ डॉ. व्ही. के. आत्रे’ हे पुस्तक वाचण्याचा योग 2005 साली आला आणि मग त्यातून इच्छा झाली डॉ. व्ही. के. आत्रे या व्यक्तीला, वैज्ञानिकाला जाणून घेण्याची. संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार, हिंदुस्थान सरकारच्या संरक्षण मंत्रालयातील संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेचे (डीआरडीओ) महासंचालक अशी तिन्ही पदे एकाच वेळी भुषविणारे डॉ. आत्रे मराठी भाषिक असावेत असा अनेकांचा समज होऊ शकतो, परंतु तत्कालीन मैसूर संस्थानाचा भाग असलेल्या बंगळुरू शहरात त्यांचा जन्म आजपासून 80 वर्षांपूर्वी म्हणजे 1939 मध्ये झाला.
वासुदेव कलकुंते आत्रे अर्थात व्ही. के. आत्रे यांनी युनिव्हर्सिटी विश्वेसरैया कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (यूव्हीसीई)मधून बी. ई. पदवी संपादन केल्यावर बंगळुरू येथील आयआयएससीमध्ये मास्टर्स डिग्रीसाठी प्रवेश घेतला. 1963 साली मास्टर्स पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी कॅनडामधील वॉटर्लू विद्यापीठात पीएचडीसाठी प्रवेश मिळवला. 1967 साली त्यांनी विद्युत अभियांत्रिकी या मूळ विद्याशाखेत तिथून पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ नोव्हा स्कॉशिया, हॅलिफॅक्स कॅनडा या ठिकाणी विद्युत अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून 1980 पर्यंत अध्यापन कार्य केले. 1977 पर्यंत ते इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स (आयआयएससी) बंगळुरूला व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून देखील कार्यरत होते.
1980 मध्ये आत्रे यांनी डीआरडीओमध्ये प्रवेश करून कोचीन येथील नेव्हल फिजिकल ऍण्ड ओशनोग्राफिक लेबॉरेटरी (एनपीओएल) या ठिकाणी काम सुरू केले. त्यानंतर 1984 मध्ये ते संस्थेचे संचालक बनले. त्यानंतर ते डीआरडीओचे मुख्य नियंत्रक (संशोधन आणि विकास) झाले. 2000 साली ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जागी फेब्रुवारी महिन्यात डीआरडीओचे महासंचालक आणि संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार झाले. जॉर्ज फर्नांडिस त्यावेळी संरक्षणमंत्री होते. 2004 साली ते या पदावरून निवृत्त होऊन डॉ. एम. नटराजन त्यांच्या जागी आले.
2000 साली ‘पद्मभूषण’ पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते डॉ. आत्रे यांना प्रदान करण्यात आला. 2016 मध्ये त्यांना हिंदुस्थान सरकारचा द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषण’ प्रदान करण्यात आला. आयआयईएसटी, शिवपूर हावडा या संस्थेचे ते सध्या अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी बंगळुरू येथील माझ्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये व्हिजिटर म्हणून वास्तव्यात प्राप्त झाली. हिंदुस्थानच्या संरक्षण सिद्धतेविषयी त्यांच्याशी चर्चा करताना विज्ञान-तंत्रज्ञानाच्या एकूण आवाक्याचादेखील अंदाज आला. हिंदुस्थानला एरॉनॉटिक्स पॉवर हाऊस बनण्यात नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत यावर खूपच खोलवर आणि वस्तुनिष्ठपणे विचार करायला हवा. एकूणच तंत्रज्ञान विकासाकडे लक्ष द्यायला हवं. याची अनेक कारणे आहेत असं सांगून डॉ. आत्रे पुढे म्हणाले, ‘यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वित्तीय आणि मनुष्यबळ या दोहोंमधील आपली गुंतवणूक फारशी मोठी नाही. अर्थात आपण तंत्रज्ञान विकास सुरू करण्यासाठी सीड कॅपिटल (बीज भांडवल) पुरसे देतो. त्यानंतर तंत्रज्ञान एका विशिष्ट स्तरापर्यंत आणून ठेवतो, परंतु नंतर त्याचा पाठपुरावा करत नाही आणि मग आपण ‘पॉवर हाऊस’ बनत नाही. पॉवर हाऊस म्हणजे शतप्रतिशत स्वयंपूर्ण नव्हे. कोणताही देश तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण नाही, परंतु 100 टक्के स्वयंपूर्ण बनू शकतो.’’ हिंदुस्थानच्या विमान आणि हेलिकॉप्टर्ससंदर्भातील प्रगतीविषयी बोलताना डॉ. आत्रे म्हणाले, ‘‘आपला नागरी विमान रचनेचा कार्यक्रम अगदी नवजात आहे. आपल्या डिझाईनद्वारे आपण अद्याप एकही परवडण्याजोगे विमान व्यापारिक तत्त्वावर उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही. गेली अनेक दशकं प्रादेशिक परिवहन विमानाविषयी भाषण, नुसती चर्चा करीत आहोत, परंतु काही ना काही कारणांमुळे आपण मागे पडत चाललो आहोत. आपली अनेक विमानं अद्याप देखभालीसाठी, दुरुस्तीसाठी किंवा अपग्रेडेशनकरिता परदेशी पाठवावी लागतात. आपण बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी चांगले विमानतळ आहेत, परंतु हिंदुस्थानसारख्या देशात त्यांची संख्या कमी असून हिंदुस्थानची एअर कनेक्टिव्हिटी वाढायला हवी.’’
‘‘तंत्रज्ञान क्षेत्रात, विशेषतः उच्च तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती करण्यासाठी देशात चांगल्या शिक्षण संस्था तयार होऊन त्यांनी चांगले शिक्षण द्यायला हवं,’’ असे सांगून डॉ. आत्रे पुढे म्हणाले, यातूनच तंत्रज्ञानाची बीजं रोवली जातात, भविष्यातलं तंत्रज्ञान नियोजन होतं, भविष्यातील तंत्रज्ञ प्रशिक्षित होतात. सिलिकॉन व्हॅलीसारखं काहीतरी घडण्यासाठी शिक्षण संस्था आणि उद्योगांमध्ये परस्परसंबंध चांगले व्हायला हवेत. आर ऍण्ड डी संस्थांपेक्षा आपणांस शैक्षणिक संस्थांचा अभिमान वाटायला हवा. देश आर्थिक महासत्ता बनण्यासाठी धडपडत असताना तो प्रामुख्याने ज्ञानसत्ता बनायला हवा. ज्ञानाचा केंद्रबिंदू विज्ञान आणि तंत्रज्ञान असून त्यातूनच विशेषतः विज्ञानाधिष्ठत तंत्रज्ञानातूनच देशासाठी संपत्ती तयार होते. म्हणून डॉ. व्ही. के. आत्रे म्हणतात ‘‘देशाने तीन गोष्टी आत्मसात करायला हव्यात, त्या म्हणजे ‘थ्री आय’ इन्व्हेंट, इनोव्हेट आणि इंडस्ट्रियलाइझ.’’ फक्त कर्जमाफीच्या मलमपट्टीने हे साध्य होणार नाही हे नक्की.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या