ट्रॅकवर पुनरागमनानंतर हिमा दासची सुवर्णधाव! चार दिवसांत दोन सुवर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
hima-das-gold

सामना ऑनलाईन । कुटनो

हिंदुस्थानची वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमाने चार दिवसांत देशाला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. 5 जुलै रोजी हिमा दासने 200 मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्णपदक पटकावून पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत ही सुवर्ण कामगिरी केली.

कुट्नो ऍथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्णपदक पटकावले आहे. हिमा दासने 23.77 सेकंद या वेळेत 200 मीटर अंतर पार करून विजयी कामगिरी साकारली. व्ही. के. विस्मयाने 24.06 सेकंदांत 200 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. पुरुषांमध्ये हिंदुस्थानच्या मोहम्मद अनसनेही 21.18 सेकंद वेळेत 200 मीटर शर्यत जिंकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

पाठीच्या दुखण्यातून उठलेल्या हिमाचा पराक्रम

400 मीटर स्पर्धेतील जागतिक ज्युनियर विजेती आणि राष्ट्रीय विक्रम नावावर असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती, मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करून चार दिवसांत हिंदुस्थानला दोन सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.