
>> अश्विन बापट
सुट्टी म्हटले की, आपली पावले हिल स्टेशन किंवा समुद्रकिनाऱयांकडे वळतात. अलीकडच्या काळात मात्र यात वैविध्य आलेय ते कृषी पर्यटनाच्या पेंद्रांनी. प्रभाकर सावेंचे सावे फार्म हे त्यापैकीच एक. डहाणूजवळील घोलवडमध्ये साकारलेले सावे फार्म.
1988-89 मध्ये प्रभाकर सावेंनी या ठिकाणी शालेय सहलींना सुरुवात केली, तर 1990-91 मध्ये कृषी पर्यटन हा व्यवसाय म्हणून इथे बीज रोवले. सुरुवातीला त्यांच्याकडे कृषी पर्यटनाच्या जोडीने भाजीपाला उत्पादन जोरात होते, तर आता 2023 मध्ये याच साथीने रोपवाटिका आणि फलोत्पादनावर त्यांनी भर दिलाय. चिकू, आंबा, नारळ, लिची आदी पिके ते घेतात. यात चिकूच्या 550 झाडांपासून त्यांना एका मोसमात 30 ते 35 टन चिकू मिळतात.
कोरोना काळात त्यांनी घरच्याच औषधी वनस्पती आणि साहित्य वापरून तयार केलेला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा काढा परिसरातील लोकांच्या चांगलाच पसंतीला उतरला होता. त्यातच गुलाबासारख्या घटकाची भर टाकून त्यांनी याचे व्यावसायिक उत्पादनही तयार करत चहाची निर्मिती केली, ज्यालाही चांगली मागणी असल्याचे सावे सांगतात.
पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांकरिता त्यांच्याकडे मचाण हाऊस, बांबू हाऊससारखी दहा वेगळय़ा शैलींतील पर्यावरणपूरक घरे आहेत. वर्षाला त्यांच्याकडे साडेतीन ते चार हजार पर्यटक वास्तव्याला येतात.
एकदिवसीय टूरसाठी येणाऱया पर्यटकांची संख्या दीड हजारांच्या घरात आहे. काळानुरूप खास करून कोरोना काळानंतर लोकांचा कृषी पर्यटनाकडे आणि आयुर्वेदिक उत्पादनांकडे कल वाढतोय, असे निरीक्षणही प्रभाकर सावेंनी नोंदवले. सावे तरुणाईला लाजवेल अशा उत्साहात ही टूर आपल्याला घडवतात. त्यांच्या फार्म विझिटमध्ये ट्रॅक्टर राइड करत आपण पोहोचतो आणि काही अंतर ही राइड झाल्यावर पायी चालत निघतो तेव्हा वेगळाच अनुभव आपल्याला येतो. त्यांच्या फार्मची टूर करता करता ते भुईआवळा, वाळा, माका अशा वनस्पतींची ते ओळख करून देतात आणि साधारण दीड तास औषधी वनस्पतींचे पुस्तकच जणू समोर ठेवतात. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटन आणि माहितीचा रिता होणारा खजिना असा दुहेरी अनुभव तुम्हाला इथे येतो. आता कृषी पर्यटनाची जबाबदारी आपला मुलगा आदित्य समर्थपणे सांभाळतोय, असेही प्रभाकर सावे अभिमानाने सांगतात.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)

























































