
सामना प्रतिनिधी । मुंबई
तमाम मुंबईकर आणि खास करून उपनगरातील क्रिकेट शौकीन उत्सुकतेने वाट पाहतात ती प्रतिष्ठsची प्रबोधन मुंबई टी -20 क्रिकेट स्पर्धा 11 एप्रिलपासून गोरेगावच्या प्रबोधन क्रीडांगणावर सुरू होत असून यजमान प्रबोधन संघासह मुंबईतील अन्य सात सर्वोत्तम संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचे यंदा 12 वे वर्ष असून यावेळीही भव्य प्रकारे या स्पर्धेचे आयोजन करण्याचे प्रबोधन या संस्थेने ठरविले आहे. गेली 40 वर्षे गोरेगावमध्ये आंतर शालेय क्रीडा महोत्सव, जलतरण, टेनिस, तिरंदाजी, बुद्धिबळ अशा खेळांच्या दर्जेदार स्पर्धांचे आयोजन करणारी असा प्रबोधनचा लौकिक आहे. त्यांची ही यशस्वी वाटचाल संस्थेचे संस्थापक आणि शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रतिवर्षाप्रमाणे स्पर्धेचा कालावधी चार दिवसांचा राहील व 14 एप्रिल रोजी दुपारी अंतिम फेरीचा सामना खेळविण्यात येईल.
मागील वर्षी या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या दादर युनियन या संघाने विजेतेपद पटकावले असले तरी या वेळी त्यांना शिवाजी पार्क जिमखाना, पार्कोफोन क्रिकेटर्स. पय्याडे स्पोर्टस् क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब, व्हिक्टरी क्रिकेट क्लब, सीसीआय आणि यजमान प्रबोधन गोरेगाव या बलढय़ संघांचा सामना करावा लागेल.
यंदाही विजेत्यांना रोख एक लाख रुपये, उपविजेत्यांना 50 हजार तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला परंपरेनुसार मोटर बाईक अशी पुरस्कारांची योजना आहे. प्रत्येक सामन्यातला उत्तम खेळाडू अशी अन्य आठ पारितोषिकेही दिली जातील, अशी माहिती प्रबोधन गोरेगावचे अध्यक्ष नितीन शिंदे यांनी दिली आहे. प्रबोधन मुंबई टी-20 ला मुंबई क्रिकेट संघटनेची मान्यता तर आहेच पण त्याचबरोबर सर्व तांत्रिक मदतही दिली जाते. अंतिम सामन्याला दिलीप वेंगसरकर, बापू नाडकर्णी, उमेश कुलकर्णी, करसन घावरी, ऍबी कुरूविला असे कसोटीपटू आणि मुंबई क्रिकेटमधील शरद हजारे, अब्दुल इस्माईल, अमोल मुजुमदार असे दिग्गज आवर्जून उपस्थित असतात.

























































