साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह सर्व आरोपींची जबाब नोंदणी सुरू

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह इतर सहा आरोपींनी मंगळवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. खटल्यात सादर केलेल्या पुराव्यांच्या अनुषंगाने फौजदारी दंड संहितेच्या कलम 313 अंतर्गत आरोपींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना साध्वी प्रज्ञासिंग भावनिक झाल्या होत्या. बुधवारीही जबाब नोंदणीची प्रक्रिया सुरू राहणार आहे.

न्यायाधीश ए. के. लाहोटी यांच्या विशेष न्यायालयात मालेगाव बॉम्बस्फोटाची नियमित सुनावणी सुरू आहे. खटल्यातील सर्व साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने फौजदारी दंड संहितेच्या कलम 313 अंतर्गत सर्व आरोपींना आपली बाजू मांडण्यास संधी दिली आहे. त्यानुसार मंगळवारी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, सुधाकर द्विवेदी, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. बॉम्बस्फोटातील मृतांचे शवविच्छेदन करणाऱया डॉक्टरांसह साक्षीदारांनी नोंदवलेले जबाब तसेच एनआयएने गोळा केलेल्या पुराव्यांच्या अनुषंगाने आरोपींना प्रश्न विचारण्यात आले. पहिल्या टप्प्यात साध्वी प्रज्ञासिंग, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर यांचा जबाब नोंदवला जात आहे. प्रश्नांना उत्तर देताना साध्वी प्रज्ञासिंग भावनिक होऊन स्तब्ध झाल्या. त्यामुळे दहा मिनिटांसाठी सुनावणी थांबवली होती. त्यांनी सर्व प्रश्नांवर ‘मला माहीत नाही’ असे उत्तर दिले. बॉम्बस्फोटातील पीडितांच्या जखमांबाबत वर्णन करणारे प्रश्न उपस्थित झाले, त्यावेळी त्या अस्वस्थ झाल्या, असे त्यांचे वकील जे. पी. मिश्रा आणि प्रशांत मग्गु यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

बॉम्बस्फोट खटल्यात सरकारी पक्षाच्या साक्षीदारांची जबाब नोंदणी पूर्ण झाली आहे. डिसेंबर 2018 मध्ये हा खटला सुरू झाला होता. खटल्याची विशेष न्यायालयात नियमित सुनावणी सुरू आहे. यादरम्यान तब्बल 323 सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी 34 साक्षीदार फितूर झाले. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथे एका मशिदीजवळ मोटरसायकलवर बॉम्बस्फोट होऊन सहा जण ठार, तर 100 हून अधिक जखमी झाले होते.