
सामना प्रतिनिधी । परभणी
सध्याची लोकशाही ही जात दांडग्या, धर्मदांडग्या आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे केंद्र बनले आहे. संविधानच ज्यांना मान्य नाही, किंवा संविधान बदलण्याची भाषा करतात त्यांना सत्तेपासून दूर केले पाहिजे, असे मत व्यक्त करत भाजप पक्षाने देशात बाजार मांडला आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.वसमत रोडवरील सावली या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेस माजी आमदार हरिभाऊ भदे, लक्ष्मण माने, विजय मोरे उपस्थित होते.
पुढे बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, भाजपा सरकारचे सर्वच आघाड्यांवर नियंत्रण सुटलेले आहे. खाजगीकरणाच्या माध्यमातून भांडवलशाही व्यवस्था पुन्हा डोके वर काढत आहे. गरीब गरीबच राहत आहे आणि श्रीमंत अधिकच श्रीमंत होत चालला आहे, अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. या व्यवस्थेला आमचा कडाडून विरोध आहे. सर्वच जाती धर्मातील वंचित लोकांना सोबत घेऊन या शक्तीच्या विरोधात लढण्याचा निर्धार बोलून दाखविला.
सत्तेपासून अनेकजण वंचित राहिले आहेत. अशा समुहाला बरोबर घेऊन आपण वंचित बहुजन आघाडी स्थापन करत असल्याचे सांगितले. या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून समाजातील सर्वच वंचित घटकांना बरोबर घेणार आहे. काँग्रेस पक्षाने जर वंचित घटकांना बरोबर घेण्याचे मान्य केले तरच आगमी निवडणूक लढवणार आहे. अन्यथा राज्यातील ४८ जागा आघाडीच्या माध्यमातून लढविणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणुकीस सामोरे जावून किमान ६०ते ७० जागेवर आघाडी मिळवील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजपाने काँग्रेसची गर्भगळीत अवस्था केली आहे. त्यामुळे काँग्रेसने सत्तेवर येण्याचे स्वप्न २०१९ ऐवजी २०२४ मध्ये पहावे, असा टोला लगावला. जिल्ह्यात किमान २२ समाज संघटना बरोबर काम करणार असल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगीतले. यावेळी माजी आमदार लक्ष्मण माने यांनी राज्यात एकिकडे दारिद्र्याचे प्रमाण वाढले असताना दुसरीकडे भीक मागणे देखील सरकारने अवघड केले आहे. गरीब माणूस केंद्रबिंदू माणून श्रीमंतासाठी मर्यादा घालून द्यावी. अनियंत्रित भांडवलशाहीमुळे भाजपाला जनता वैतागली असल्याचे यावेळी बोलून दाखविले.

























































