येत्या लोकसभेत मोदी यांची छाती 20 इंच होईल, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विविध प्रश्नांवर मौनीबाबा बनलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंचाची छाती लोकसभेपर्यंत 20 इंच होईल, मुस्लिमांना भाई म्हणणे हे सरसंघचालक मोहन भागवत यांचे ढोंग आहे. मुस्लिमांचा कळवळा असेल तर त्यांनी गोळवळकरांच्या ‘वि अ‍ॅण्ड अवर ब्रदरहूड’ पुस्तकाची होळी करावी असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. आरक्षणाचा मुद्दा व्यवस्थित मांडला तरच सोडवला जाऊ शकतो. राज्यात 48 जागांवर प्रभावी उमेदवार देणार असून, आम्हाला सत्ता दिल्यास सर्व प्रश्न सोडवू असेही ते म्हणाले.

अ‍ॅड. आंबेडकर यांनी आज सुभेदारी विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पंतप्रधान व त्यांच्या विदेशी धोरणाची पातळी घसरली असून ते आता आतंकवादाकडे चालले आहे. कॅनडातील विद्यार्थ्यांची युक्रेनच्या विद्यार्थ्यांसारखी उपासमार होवू नये असे धोरण आखावे. श्रीमंतांची मुलेच कॅनडात आहेत. त्यांनीच मोदींचे सरकार आणले. त्यामुळे आपला दांडू आपल्याच गोत्यात अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले.

56 इंची छाती 20 इंच होणार

पाकिस्तान कुरापती काढतो आणि मोदी काहीच करत नाहीत. कारण त्यांची 56 इंची छाती आता 24 इंची झाली आहे. इंदिरा गांधींनी हे करून दाखवले असते. पाकिस्तान गोळ्या घालतो आणि तुम्ही काहीच करत नाहीत. त्यामुळे येत्या निवडणुकीपर्यंत 24 इंची छाती 20 इंचच होणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

मराठी माणसांसाठी हाऊसिंग उभारा

मराठी माणसाला गुजराती सोसायटीत घर नाकारल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, आजवर एक सोडला तर सर्व मुख्यमंत्री मराठी होते. याचे उत्तर त्यांनीच द्यावे. मी यावर परळ ते लोअर परळ, सेंट्रल माटुंगा ते वेस्टर्न माटुंगा असा नवा बीकेसी प्रस्तावित केला होता. यातील अर्धा भाग कमर्शिअल आणि उर्वरित मराठी माणसांच्या हाऊसिंगसाठी दिला तरी साधारण लाखभर घरे बांधता येतील असे ते म्हणाले.

हे लुटारुंचे राज्य

आरक्षणात जातधर्म आणला जात आहे. मात्र नोकरी नाही. त्यासाठी लोकांची मानसिकता ओळखता आली पाहिजे. त्यासाठी शाश्वत व्यवस्था लागते. जातधर्माने शाश्वतताच संपते व लुटारुंचे राज्य येते. काँग्रेसवाल्यांनी लुटले हे म्हणणे चूक आहे. कारण आता तर लुटारुंचेच राज्य असल्याचा टोला त्यांनी लगावला.

सत्ता द्या आरक्षणावर मार्ग देतो

सुप्रिम कोर्ट आरक्षण 50 टक्क्यांवर जाऊ देणाार नाही. आरक्षण नाकारताना कोर्टाने इंम्पेरिकल डाटा मागितला. मात्र तो न देता दादागिरी करून आरक्षण मागणार असाल तर ते मिळणार नाही. ओबीसीच्या 27 टक्क्यांत शिरकाव करण्याची गरज नाही. हाती सत्ता द्या त्यावर वंचित मार्ग काढेल असे ते म्हणाले.

साडेपाच लाख कोटींचे नियोजन नाही

साडेपाच लाख कोटींचे नियोजन नसल्याने दोन वर्षांपासून गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. कारण विधानसभेत केवळ चर्चा होत. मात्र शिष्यवृत्ती, मुलभूत सुविधा आणि शतकर्‍यांचा विचार केला जात नसल्याने हा पैसा योग्य वापरात येत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

मुस्लिम प्रेम हे मोहन भागवतांचे ढोंग

सरसंघचालक मोहन भागवत हे मुस्लिमांना भाई म्हणतात यावर, मोहन भागवतांचे मुस्लिमप्रेम हे ढोंग आहे. त्यांना मुस्लिम व मागासांचा कळवळा असेल तर त्यांनी गोळवळकरांच्या ‘वुई अ‍ॅण्ड अवर ब्रदरहूड’ या पुस्तकाची होळी करावी किंवा ते नाकारावे असे आव्हान त्यांनी दिले.

…तर 48 जागा लढवणार

इंडियाने वंचितचा समावेश का केला नाही याविषयी ते म्हणाले की, त्यांनी का घेतले नाही हे तेच सांगू शकतील. त्यामुळे ते स्वतंत्र उमेदवार देत असतील तर वंचितनेही 48 ठिकाणी तगडे उमेदवार देण्याची तयारी केली आहे. मी 84 पासून मुस्लिमांसोबत असून, अकोला लोकसभा लढणार आहे. एमआयएमकडे मुस्लिम मास नसल्याचे ते एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.