प्रथमेश जावकरचा अचूक निशाणा, पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला हरवत पटकावले सुवर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा 19 वर्षीय तिरंदाज प्रथमेश जावकरने कंपाऊंडमध्ये वैयक्तिक प्रकारात जगातील पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूला हरवत तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. प्रथमेशने साधलेल्या या निशाण्यामुळे साऱ्या देशाची मान उंचावली आहे. या विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडूंनी तीन पदके जिंकत तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या चरणाची सांगता केली. ज्योती वेनाम व ओजस देवताळे यांनी देखील मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला ‘सोनेरी’ यश मिळवून दिले.

वैयक्तिक पुरुष कंपाऊंडच्या फायनलमध्ये प्रथमेश जावकरने चुरशीच्या अंतिम लढतीत अव्वल मानांकित नेदरलॅण्ड्सच्या माइक श्लोएसरवर 149-148 असा निसटता विजय मिळवीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. शेवटच्या सेटमध्ये प्रथमेशने 10 गुण मिळवले तर माइकने 9 गुण मिळवल्याने प्रथमेशने हा सामना जिंकत सुवर्णपदक पटकावलं.

हिंदुस्थानच्या अवनीत कौर हिने महिलांच्या कंपाऊंडमध्ये कांस्यपदक मिळविले. 18 वर्षीय अवनीतला उपांत्य फेरीत इंग्लंडच्या एला गिब्जकडून पराभूत व्हावे लागले. मग कांस्यपदकाच्या लढतीत तिने तुर्कीच्या इपेक तोमरुकचा 147 – 144 असा पराभव करून कांस्यपदकाला गवसणी घातली.