हॉस्टेलवर बॉम्ब बनवत असताना स्फोट झाला, अलाहाबाद विद्यापीठाचा विद्यार्थी गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉस्टेलच्या खोलीत एक विद्यार्थी बॉम्ब बनवत असताना स्फोट झाला. या स्फोटात हा विद्यार्थी गंभीररित्या जखमी झाला आहे. बॉम्ब बनवत असताना हातातच हा बॉम्ब फुटला होता. ही घटना बुधवारी घडली असून पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरू केला आहे. जखमी झालेला विद्यार्थी हा बॉम्ब का बनवत होता याची अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये.

प्रभात यादव असं जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो अलाहाबाद विद्यापीठातून एमए चे शिक्षण घेत आहे. प्रभात पीसी बॅनर्जी हॉस्टेलमध्ये राहात होता आणि आपल्या खोलीत बसून तो बॉम्ब बनवत होता. बॉम्ब हातात असतानाच त्याचा स्फोट झाल्याने प्रभातच्या उजव्या हाताला जबरदस्त इजा झाली आहे. प्रभातला एसआरएन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजेश कुमार यादव यांनी दिली आहे. या स्फोटात आणखी एक विद्यार्थी जखमी झाला असल्याचेही यादव यांनी सांगितले. सदर प्रकरणात लवकरच प्रभात यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.