
सामना ऑनलाईन। भादोही
काँग्रेसने 70 वर्षांत काय केले, अशी भाषणे भाजप नेते करत आहेत. पण भाषणालाही एक्सपायरी डेट असते. त्यामुळे याची एक्सपायरी डेट संपली आहे. त्यामुळे आता भाजपने पाच वर्षांत काय केले ते जनतेला सांगावे. तसेच दोन वर्षांत उत्तर प्रदेशचा विकास केला का, हे जनतेपुढे मांडावे, असे आव्हान काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी दिले.
प्रियंका गांधी-वढेरा या सोमवारपासून प्रयागराज ते वाराणसी जलमार्गे बोटीने तीन दिवसांच्या प्रचार दौऱयावर आहेत. रात्री त्यांचा मुक्काम भादोहीत होता. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली. दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सरकारने रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध केले आहे. हे कार्ड दिसायला खूप आकर्षक असले तरी विकास आणि योजनांबाबतची वस्तुस्थिती निराळी आहे. केंद्र सरकारने पाच वर्षांत काय केले हे आता कळले आहे. देशात सर्वच दुःखी आहेत. सरकारचा विकास फक्त कागदावर आहे, अशी टीकाही त्यांनी केली.


























































