
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वातावरण तापत आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. काही संस्थानी मतदानपूर्व जनमत चाचणी घेतली आहे. या चाचणीत एनडीएच यूपीएपेक्षा सरस ठरणार असल्याचे निष्कर्ष आले आहेत. या निष्कर्षानुसार एनडीएला 250 पेक्षा जास्त तर काँग्रेसला 150 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर पक्षांना 100 च्या आसपास जागा मिळण्याचा अंदाज असल्याने निवडणुकीनंतर हे पक्ष महत्वाची भूमिका बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जन की बात, सी वोटर आणि व्हीएमआर या संस्थांनी सर्वेक्षण करून ही मतदानपूर्व चाचणी घेतली आहे.
जन की बात या संस्थेने घेतलेल्या जनमत चाचणीनुसार भाजपप्रणित एनडीएला 314-316 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए आघाडीला 117-126 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इतर पक्षांना 110- 113 जागा मिळण्याची शक्यता आहे. सी वोटरच्या चाचणीनुसार एनडीएला 261 जागा, यूपीएला 143 जागा आणि इतर पक्षांना 139 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर व्हीएमआरने घेतलेल्या चाचणीत एडीएला 283 जागा, यूपीएला 135 जागा तर इतर पक्षांना 125 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
2014 च्या निवडणुकीपेक्षा यंदाचे वातावरण बरेच बदलले आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या जागांवर थोड्याफार फरकाने त्याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना सुमारे 100 जागा मिळण्याची शक्यता असल्याने निवडणुकीनंतर हे पक्ष महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे.


























































