फिफा विश्वचषक : पराभवानंतर राष्ट्राध्यक्षा कोलिंडा यांनी पुसले क्रोएशियन खेळाडूंचे अश्रू

52

सामना ऑनलाईन | मॉस्को

फुटबॉल विश्वचषकात पराभूत झालात ,पण चुरशीची झुंज देऊन हरलात. त्याचे आता वाईट वाटून घेऊ नका. वर्ल्ड कप फ्रान्सने जिंकला ,पण जगभरातील फुटबॉल शौकिनांचे हृदय तुम्ही जिंकलात ,अशा शब्दांत क्रोएशियन राष्ट्राध्यक्षा कोलिंडा ग्राबर कितारोव यांनी आपल्या फुटबॉलपटूंचे सांत्वन करीत त्यांचे अश्रू पुसले. महिला राष्ट्राध्यक्षांनी आपल्या या कृतीने क्रोएशियनच नव्हे तर जगातील फुटबॉल शौकिनांची मने जिंकली. फ्रान्सने फिफा विश्वचषक अंतिम लढतीत क्रोएशियावर ४-२ असा विजय मिळवल्यावर क्रोएशियन फुटबॉलपटूंना आपले अश्रू आवरता आले नाहीत.
पराभवाने दुःखी झालेल्या आपल्या खेळाडूंचे सांत्वन करण्यासाठी मग क्रोएशियन राष्ट्राध्यक्षा कोलिंडा पुढे सरसावल्या. त्यांनी प्रत्येक फुटबॉलपटूजवळ जाऊन त्याला धीर दिला. पराभूत झालात तरी तुम्ही देशाचे महानायक आहात , असे सांगत कोलिंडा यांनी आपल्या हाताने क्रोएशियन फुटबॉलपटूंचे अश्रू पुसले. त्यानंतर त्यांनी खिलाडूवृत्ती दाखवत विजेत्या फ्रान्सच्या फुटबॉलपटूंनाही भेटत त्यांचेही अभिनंदन केले.

..अन कोलिंडाना अश्रू आवरले नाहीत

क्रोएशियाच्या यशात सिंहाचा वाटा उचलणारा स्टार लुका मॉड्रीच याला भेटताना मात्र कोलिंडा अतिशय भावुक झाल्या. मॉड्रीचला अश्रू ढाळताना पाहून कोलिंडानाही अश्रू आवरले नाहीत. पण त्यांनी लगेच स्वतःला सावरत मॉड्रीचचे अश्रू पुसत त्याला शांत केले. याप्रसंगी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅनुअल मॅक्रो हेही उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या