अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना दयेच्या याचिकेचा अधिकार नको – राष्ट्रपती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सामूहिक बलात्काराचे गुन्हे वाढल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त करतानाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बलात्कार प्रकरणातील आरोपींना दयेचा अर्ज करण्याची तरतूदच नको असे वक्तव्य केले. हैदराबाद, राजस्थान आणि उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणांमुळे देशातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

राजस्थानातील ब्रह्मकुमारी इन्स्टिटय़ूशनमध्ये ‘समाज परिवर्तनासाठी महिलांचे सबलीकरण’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते झाले. मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनी प्रत्येकाचे काळीज हेलावत असून महिलांची सुरक्षा हा गंभीर मुद्दा बनला आहे, असे राष्ट्रपती कोविंद यावेळी म्हणाले.

आरोपीला दयेची याचिका करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, पण आता त्यावरही पुनर्विचार करायला हवा, ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झालेल्या म्हणजेच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱया आरोपींना दयेचा अर्ज करण्याचा अधिकारच नाकारला पाहिजे असे राष्ट्रपती यावेळी म्हणाले. घटनेमध्ये यासंदर्भात दुरुस्ती करणे गरजेचे असून तो अधिकार देशाच्या संसदेला आहे आणि त्या दिशेने विचारही होत आहे असे ते पुढे म्हणाले.

हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार करून तिला जाळून मारले गेले. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यावर पेट्रोल टाकून भररस्त्यात जाळले गेले. राजस्थानातील टोंक येथे अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनांचा देशभरातून निषेध होत आहे. हैदराबाद घटनेतील चार आरोपींना आजच पोलिसांनी चकमकीत ठार केले. या घटनांचा देशभरातून निषेध होत असतानाच दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणातील आरोपींचा दयेचा अर्ज राष्ट्रपती कोविंद यांनी फेटाळून लावला.