
महागाई, बेरोजगारी, शेतकऱयांचे प्रश्न यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी काही जण सातत्याने आणि जाणीवपूर्वक बेताल वक्तव्ये करून महापुरुषांचा अवमान करत आहेत. अशा वाचाळवीरांना रोखण्यासाठी सरकारने कायदा केला पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज केली. येत्या विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कसबा-चिंचवडची निवडणूक लढवण्यावर ठाम
कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणूक लढवण्यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असल्याचे अजित पवार या वेळी म्हणाले. प्रत्येकाला आपापली तयारी करण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे नेते आले नव्हते. मात्र आमची व उद्धव ठाकरे यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. चिंचवडसाठी आतापर्यंत माझ्याकडे नऊ लोकांनी उमेदवारी मागितली आहे. याबाबत त्यांच्याशी समोरासमोर बोलणार आहे. त्यानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या व आमच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. मागील विधानसभेत कसब्याची जागा काँग्रेसला सोडण्यात आली होती. त्याबाबतही पुण्यात गेल्यावर काँग्रेससह शिवसेना व इतर मित्रपक्षांशी चर्चा करेन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
तुकोबांचा अवमान करणाऱ्या बागेश्वर बाबावर कारवाई करा
संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून त्यांचा अवमान करणाऱया बागेश्वर बाबावर सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही या वेळी अजित पवार यांनी केली. तुकाराम महाराजांचा अवमान कदापि सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
‘हास्यजत्रा’फेम प्रभाकर मोरे राष्ट्रवादीत
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम प्रभाकर मोरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या कोकण विभाग अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
‘सर्वसामान्यांचे सरकार’ गेलेले उद्योग परत का आणत नाही?
शिंदे-फडणवीस सरकार हे ‘सर्वसामान्यांचे सरकार’ आहे असे म्हणतात, पण या सरकारकडून कुठेही महागाई कमी करण्याचा, राज्याबाहेर गेलेले उद्योग पुन्हा राज्यात आणण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. बाहेरचे मुख्यमंत्री येतात आणि इथल्या उद्योगपतींना, बॉलीवूड आणि वेगवेगळय़ा क्षेत्रांना तुम्ही ‘‘आमच्याकडे चला’’ बोलत आहेत. तरीही आमचे ‘सर्वसामान्यांचे सरकार’ सुरू आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली. या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश प्रवत्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

























































