
फ्रान्समध्ये मोहम्मद पैंगबरांच्या कार्टूनवरून सुरू झालेल्या वादाचे पडसाद अजूनही दिसत आहे. या वादानंतर हल्ल्याचे सत्र अजूनही सुरुच आहे. फ्रान्सच्या लिओन शहरात शनिवारी एका चर्चच्या धर्मगुरुवर (पादरी) हल्ला करण्यात आला. पादरीवर गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
लिओन शहरात संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास चर्च बंद करत असताना एका पादरीवर हल्ला करण्यात आला. यावेळी दोनवेळा गोळीबार करण्यात आला. पादरीवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे. जखमी पादरीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीसांनी परिसराची नाकाबंदी केली असून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.
फ्रान्सच्यानीस शहरात गेल्या आठवड्यात एका महिलेसह तिघांची हत्या करण्यात आली होती. चर्चमध्ये प्राथनेसाठी गर्दी असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता. फ्रान्समध्ये मोहम्मद पैंगबर यांच्या कार्टूनवरून वाद सुरू झाला असून हल्ल्याच्या घटना घडत आहेत.
विद्यार्थ्यांना हे कार्टून दाखवणाऱ्या शिक्षकाचीही एका विद्यार्थ्याने हत्या केली होती. या घटनेनंतर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मँकों यांनी अभिव्यक्ती स्वांतत्र्याचे समर्थन केले होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचे हल्ले खपवून घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तसेच इस्लामबाबतही वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता. मात्र, या विवादानंतर अद्यापही फ्रान्समध्ये हल्ल्याचे सत्र सुरू आहे.






















































