प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढणार निवडणूक?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । रायबरेली

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा या लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावरून चर्चा रंगलेली असतानाच आता त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. प्रियंका यांनी आज रायबरेली येथे कार्यकर्त्यांना ‘मी वाराणसीतून निवडणूक लढवू का? असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नानंतर त्या मोदींविरोधात निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, प्रियंका या गुरुवारी रायबरेली येथे प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी तेथील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांनी प्रियंका निवडणूक लढवणार का आणि जर लढवणार असतील तर कुठून लढवणार असे प्रश्न त्यांना केले. त्यावर त्यांना मिश्किलपणे हसत वाराणसीतून निवडणूक लढवू का, असा सवाल केला. त्यांच्या या प्रश्नाने काही वेळ कार्यकर्तेही आश्चर्यचकित झाले होते. बुधवारी अमेठी येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत प्रियंका यांनी जर पक्षाची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवेन असे स्पष्ट केले होते.

वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून मोदी 2014 ला मोठ्या मताधिक्याने जिकंले होते. 2019 मध्येही मोदी याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.