
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात कॉक्रोज जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनाच रणशींग फुंकलं आहे. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी आणि आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र, दुसरीकडे विद्यार्थ्यांसह आंदोलकांनी मार्ग काढत संसद भवनाजवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि अमानुष लाठीमार केला, ज्यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या संपूर्ण घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकार आणि पोलिसांच्या कारवाईवर जोरदार निशाणा साधला.
ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्या म्हणाल्या, “आम्ही सगळे केवळ चर्चेची मागणी करत आहोत. शिक्षण धोरणात अनेक त्रुटी आणि मोठे मुद्दे आहेत, तरीही तुम्ही त्यावर चर्चा करायला तयार नाही. उलट चर्चेऐवजी तुम्ही विद्यार्थ्यांवर अश्रूधुराचा वापर करत आहात आणि त्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत आहात. हे कशासाठी चालले आहे? ही शेवटी आपलीच मुले आहेत.” प्रियंका गांधी यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातूनही या कारवाईचा मोठा निषेध केला जात आहे.
#WATCH | Delhi: Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “We are all asking for a discussion. There are problems and major issues with the education policy. Yet, you are unwilling to discuss it; instead, you are using tear gas on the students and beating them up. For what? They… pic.twitter.com/nRmu2O2T9k
— ANI (@ANI) July 20, 2026
पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि लागोपाठ लावण्यात आलेले अडथळे झुगारून आंदोलकांनी अनेक किलोमीटरची पायपीट केली. वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र येत, घोषणाबाजी करत आंदोलक पोलिसांची तटबंदी भेदण्यासाठी मार्ग शोधत होते. अनेक तास चाललेल्या या थरारानंतर मध्य दिल्लीतील सुरक्षेत कमालीची वाढ करण्यात आली असून प्रमुख रस्त्यांवर अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहे. परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुरू असलेले हे आंदोलन आता अधिकच तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.





























































