
भाजपचे विद्यमान राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आज भाजपा श्रेष्ठींनी प्रमोशन देत त्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी आज नेमणूक केली.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपांतर्गत राजकारणातून विनोद तावडे यांचे तिकीट कापण्यात आले होते. मात्र, त्यानंतर भाजपा श्रेष्ठींनी तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी नेमणूक करत राष्ट्रीय राजकारणात तावडे यांना संधी दिली होती. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांना अजून सुमारे अडीच वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे तावडे यापुढे राज्याच्या राजकारणाऐवजी राष्ट्रीय राजकारणातच सक्रिय राहतील, हे स्पष्ट झाले आहे. संयम बाळगल्यास फळ कसे मिळते याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया तावडे यांनी दिली आहे.
विनोद तावडे सध्या हरयाणाचे भाजप प्रभारी असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवडत्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणूनही ते काम करतात. त्याचबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचेही ते समन्वयक आहेत.
पूर्वी काँग्रेसची भूमिका टीव्हीवर मांडणाऱया शेहजाद पुनावाला यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर भारती घोष यांचीही प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे. ऋतुराज सिन्हा व आशा लाकडा यांची राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या आदेशाने भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी आज याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली.

























































